वडीगोद्री ( जालना) : ''सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव असून मराठा समाजाविषयी माया असती तर उपोषण सुरू असताना चार चार दिवस लावले नसते'', असा आरोप मनोज जरांगे यांनी सरकारवर केला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा उपोषण करत आहे. दरम्यान आज, मंगळवारी उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. मात्र, आपण कोणतेही उपचार घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
लोकसभा निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी ८ जून पासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. आज माध्यम प्रतिनिधींसोबत जरांगे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला कठोर शब्दात इशारा देत प्रकृती खालवली तरीही उपोषण सुरूच राहील असे जाहीर केले. मनोज जरांगे म्हणाले, ''उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. मात्र, अद्याप कोणाशीच संपर्क झालेला नाही. सरकार बैठका घेऊन निर्णय काढू असं सांगून मराठ्यांना लाडीगोडी लावत आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीत जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव नव्हता असे वक्तव्य केले होते, यावर जरांगे यांनी ''छगन भुजबळ यांनी आम्हाला सांगू नये, तू थोड थांब कळेल तुला'', असा हल्ला चढवला. ''सरकार ने दखल घेतली नाही तर मराठे त्यांना नंतर कचका दाखवतील'', असा इशारा देखील जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला दिला आहे.
उपचार घेणार नाही ''डॉक्टर म्हणालेत, उपचार घ्यावे लागतील. बीपी कमी झालाय, पण उपचार घेणार नाही.'' असा निर्धार करत उपोषण सुरूच राहील अशी भूमिका जरांगे यांनी स्पष्ट केली.