लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भरधाव पाण्याच्या टँकरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात आजोबासह नातवाचा मृत्यू झाला. ही घटना जालना शहरातील मोतीबागेनजीक मंगळवारी दुपारी ३ वाजता घडली. लक्ष्मण तुकाराम राठोड (आढे, वय- ६०), नितीन संतोष राठोड (१४, दोघे रा. गोंदी तांडा, ता. अंबड) अशी मयतांची नावे आहेत.अंबड तालुक्यातील गोंदी तांडा येथील लक्ष्मण तुकाराम आढे व त्यांचा नातू नितीन संतोष राठोड हे दोघे मंगळवारी दुपारी दुचाकीवरून (क्र.एम.एच. २०- झेड. ९११) तुपेवाडी तांडा येथून गोंदी तांड्याकडे जात होते. त्यांची दुचाकी जालना शहरातील मोतीबाग नजीक आली असता अंबड चौफुलीकडून येणाऱ्या टँकरने (क्र.एम.एच.०४- डी.एस.५९७९) जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील लक्ष्मण आढे, नितीन राठोड या दोघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कदीम पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन टँकरखाली अडकलेले पार्थिव बाहेर काढले. घटनास्थळाचा पंचनामा करुन पार्थिव शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकरणी रामेश्वर उत्तम राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टँकर चालकाविरूध्द कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास सपोनि मोरे हे करीत आहेत. अपघात झाल्यावर काँग्रेसचे पदाधिकारी विनोद यादव यांनी पोलिसांना माहिती देऊन परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.टीसी काढण्यासाठी गेले होते दोघेनितीन हा तुपेवाडी येथे ७ वीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याची टीसी काढण्यासाठी आजोबा लक्ष्मण आढे व नितीन राठोड हे दोघे मंगळवारी सकाळी घरातून बाहेर पडले होते. दाखला काढून परत येत असताना हा अपघात झाला.मामाकडेच राहत होता नितीननितीन दोन वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे दीर्घ आजाराने निधन झाले. तेव्हापासून त्याची आई संगीता संतोष राठोड, बहीण पायल राठोड व तो आपल्या मामाकडे राहत होता.
अपघातात आजोबासह नातू जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 1:03 AM