- फकिरा देशमुखभोकरदन (जालना) : दिवाळी सणांच्या निमित्ताने नातीचा हट्ट पुरविण्यासाठी केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे खरेदीसाठी आज दुपारी थेट बाजारात दाखल झाले. यावेळी नात युवराज्ञीसाठी फटाके आणि लक्ष्मीपूजनाचे साहित्य खा. दानवे यांनी सर्वसामान्यांसारखे स्थानिक बाजारपेठेतून खरेदी केले.
मंत्री रावसाहेब पाटील दानवे आपल्या साध्या राहणी आणि ग्रामीण बोलीसाठी प्रसिध्द आहेत. मंत्री दानवे अनेक सणांसाठी देशात कुठेही असो आपल्या घरी येतात. यावर्षी देखील दानवे दिवाळीसाठी घरी आलेले आहेत. आज लक्ष्मीपूजन असल्याने घरात पुजेची तयारी सुरु होती. तर दुसरीकडे लाडकी नात युवराज्ञी फटाके घ्या म्हणून आजोबा मंत्री दानवेंकडे हट्ट धरून बसली होती. यामुळे आजोबा दानवे नातीला घेऊन थेट स्थानिक बाजारपेठेत आले.
स्थानिक बाजारातील व्यापाऱ्यांकडून मंत्री दानवे यांनी बत्ताशे, साखर फुटाणे, लाह्या, पणत्या असे लक्ष्मी पूजनाचे साहित्य खरेदी केले. दरम्यान, अख्ख्या बाजारचे लक्ष आजोबा व नातीच्या खरेदीकडे होते. नातीनेनंतर आजोबाजवळ फटाक्यांच्या खरेदीचा हट्ट केला. तेव्हा मंत्री दानवे यांनी फटाका मार्केटमध्ये जात नातीच्या इच्छेनुसार फटाक्यांची खरेदी केली. या दोघांचे संभाषण, नातीचे लाड पुरवणे हे पाहून नागरिकही अनेक वर्ष खासदार, केंद्रीय मंत्री असलेल्या दानवे यांचा साधेपणा उत्सुकतेने पाहत दाद देत होते.