दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पाणीटंचाईच्या चटक्यामुळे पाणी बचतीचे महत्त्व उमगलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाला यावर्षी प्राधान्य दिले. त्यामुळे जालना जिल्हा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अनुदान वाटपात राज्यात पहिल्या क्रमांकावर असून, जिल्ह्यात आतापर्यंत ७ हजार ७५१ जणांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. यात अहमदनगर दुसऱ्या तर नाशिक तिस-या स्थानी आहे.पंतप्रधान कृषी सिंचन योजनेला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. यावर्षी जास्त शेतकºयांनी कृषी विभागाकडे ठिबक सिंचनाच्या अनुदानासाठी मागणी नोंदविली. आतापर्यंत जिल्ह्यातील ७ हजार ७५१ शेतकºयांना २३ कोटी रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यात बहुतांश तालुक्यांत पर्जन्याचे असमान वितरण असल्याने पाणीटंचाईच्या क्षेत्राचा दरवर्षी विस्तार होत आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालानुसार, विभागातील निम्म्याहून अधिक तालुक्यांतील भूजलपातळी तीन मीटरपर्यंत खालावली आहे.पाणीटंचाईचा परिणाम विभागातील सिंचनावर झाला आहे. पावसाच्या पाण्याचा साठा करणे आणि पाण्याची बचत करण्यासाठी आता जिल्ह्यातील शेतकरी स्वत:हून पुढाकार घेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ठिबक सिंचनामुळे पाण्याच्या वापरात काटकसर करता येत असल्याने शेतक-यांचा ठिबक सिंचनास प्रतिसाद वाढू लागला आहे. जिल्ह्यातील ७ हजार ७५१ शेतक-यांनी शासनाच्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून आपल्या शेतात ठिबक सिंचन सुविधा उभारली आहे.२३ कोटींचे वितरणपंतप्रधान कृषी सिंचन योजनेत अनुदानासाठी जिल्ह्यातील ३४ हजार १११ शेतक-यांनी आॅनलाइन नोंदणी केली. त्यापैकी २१ हजार २५५ अर्जांना पात्र ठरले. त्यातील ७ हजार ७६१ शेतक-यांना २३ कोटी रुपयांचे अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.
अनुदान वाटपात जालना जिल्हा राज्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 1:02 AM