धावडा : गतवर्षी परतीच्या पावसामुळे खरीप पिकांच्या नुकसानीपोटी धावडा, वालसावंगी या दोन गावांतील शेतकऱ्यांसाठी एक कोटी ३७ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. हे अनुदान चार हजार २९३ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.
गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे धावडा व वालसावंगी या दोन गावांतील चार हजार २९३ शेतकऱ्यांचे अनुदान अप्राप्त होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती; परंतु दोन दिवसांपूर्वी दोन गावांतील शेतकऱ्यांसाठी एक कोटी ३७ लाख रुपये अनुदान आले असून, ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. एका एकराला एक हजार ते १२०० रुपये अनुदान प्राप्त झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शेतकरी कमी अनुदान आल्याबाबत विचारणा करीत असल्याने बँक अधिकारी दुसरा हप्ता आला तर येईल, असे सांगून त्यांचे समाधान करीत आहेत. प्राप्त अनुदानात धावडा येथील १८०२ शेतकऱ्यांचे ३१ लाख ६२ हजार ७०० रुपये, तर वालसावंगी येथील २ हजार ५९१ शेतकऱ्यांचे ७२ लाख १० हजार ७०० रुपये अनुदान जमा झाले आहे.
अनुदान वाटपास प्रारंभ
सध्या धावडा गावातील शेतकऱ्यांना हे अनुदान वाटप सुरू करण्यात आले आहे. धावडा गावाचे वाटप संपल्यानंतर वालसावंगी येथील शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वाटप करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी कोरोनातील नियमांचे पालन करून अनुदान उचलावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे शाखाधिकारी ज्ञानेश्वर पाडळे यांनी केले आहे.