विष्णू वाकडे
जालना : पाणलोटमधून पुढे येत द्राक्ष बागेचे हब म्हणून परिचित झालेल्या कडवंची येथील द्राक्ष बागायतदारांनी आता पर्यायी फळबागांकडे मोर्चा वळविला आहे. परिणामी या भागात आता केळी, सीताफळासह पेरू, मोसंबीच्या बागा बहरू लागल्या आहेत.
तब्बल बाराशे एकरच्या वर एवढे मोठे क्षेत्र द्राक्ष बागेचे असताना गेल्या २०-२५ वर्षापासून द्राक्षामध्ये काम करणाऱ्या उत्पादकांनी आता द्राक्ष उत्पादनाकडे काही प्रमाणात पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच-सहा वर्षाचा अनुभव विचारात घेता कडवंची येथील द्राक्ष उत्पादकांना द्राक्ष फळ पिकापासून नुकसान सहन करावे लागत आहे. हवामान बदलाचा सर्वात मोठा फटका द्राक्ष बागांना बसल्याचे येथील द्राक्ष उत्पादक सांगतात. सन २०१९ - २०च्या हंगामामध्ये द्राक्ष बागांमध्ये व्यवस्थित फूट झाली नसल्याने उत्पन्नाला फटका बसला. २०२० - २१च्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवेळी पाऊस पडल्याने पूर्णतः घड जिरले. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. एकरी दोन ते तीन लाख रुपयाचा खर्च करून अनेकांचा खर्चही वसूल झाला नसल्याचे पांडुरंग क्षीरसागर यांनी सांगितले. तर प्रगतशील शेतकरी श्रीकांत क्षीरसागर यांनी सांगितले की, वडिलोपार्जित द्राक्ष शेतीमध्ये नवीन काही बदल करण्यासाठी आपण पाच एकर वर गतवर्षी केळीची लागवड केली. यासाठी टिशू कल्चरची रोपे आपण वापरली असून, प्रतिझाड दीडशे रुपयांपर्यंत खर्च आला. खर्च वजा जाता बारा लाखांचे उत्पन्न या केळीच्या बागेपासून मिळाले. श्रीकांत यांनी यावर्षी केळीचा खोडवा घेतला जेणेकरून खर्चात मोठी बचत झाली. अशा प्रकारचा प्रयोग दोन ते तीन वेळा जाणीवपूर्वक करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो