विष्णू वाकडे ।लोकमत न्यूज नेटवर्करामनगर : जालना तालुक्यातील धारकल्याण येथील प्रगतशील शेतकरी सदानंद जगन्नाथ उगले यांनी त्यांच्याकडील पाऊण एकर द्राक्षबागेतून तब्बल बावीस लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. त्यामुळे उगले यांचा द्राक्ष शेतीचा प्रयोग अन्य शेतकऱ्यांचे मार्गदर्शक ठरत आहे.उगले यांनी काही वर्षांपूर्वी धारकल्याण येथे दोन एकर द्राक्षाची लागवड केली. हळूहळू अनुभवातून उगले यांनी द्राक्ष बागेचे क्षेत्र वाढवले. सध्या त्यांच्याकडे दहा एकर द्राक्ष क्षेत्र आहे. द्राक्ष बागांचे आगार समजल्या जाणाºया कडवंचीतील द्राक्ष उत्पादकांनाही त्यांनी मागे टाकले आहे. सदानंंद उगले यांच्या प्रेरणेतून धारकल्याण गावात सध्या साडेचारशे एकरवर द्राक्ष लागवड झाली. द्राक्ष बागेत काम करताना वातावरणातील बदलाची काळजी घ्यावी लागते. त्यानुसार औषधांची फवारणी करून नियोजन करावे लागते, असे उगले यांनी सांगितले. जानेवारी ते मार्च या दरम्यान द्राक्षाचा हंगाम शक्यतो पूर्णत्वास येतो. परंतु, सदानंद उगले यांनी स्वत:चे प्रयोग करीत एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत द्राक्ष विक्रीस ठेवल्याने त्यांना आर्थिक लाभ झाला. त्यांनी दहा एकर द्राक्ष बागेच्या छाटणीचे केलेले नियोजन साधारण आक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत १० ते १५ दिवसाच्या अंतराने छाटणी केली. ज्या पाऊण एकर द्राक्ष बागेतून त्यांनी बावीस लाख रूपये मिळविले. त्या बागेची छाटणी नोव्हेंबरच्या शेवटी घेतल्याने त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे अवघ्या ७५० वेलीपासून सुमारे ३० टन द्राक्ष त्यांना मिळाले. याची विक्री त्यांनी जबलपूर येथील व्यापाºयास प्रतिकिलो ७५ रूपये दराने केली. एका वेलीवर ४० ते ४२ द्राक्षाचे उत्पादन मिळाले. सध्या कडवंची, नंदापूर परिसरात द्राक्ष हंगाम संपत आला असताना उगले यांच्या द्राक्षांची विक्री सुरू आहे.रासायनिक शेतीला सेंद्रीय शेतीची मोठी जोड दिल्यामुळेच उच्चांकी उत्पादन आणि उच्चांकी भाव मिळाल्याचे उगले सांगतात.शेणखता बरोबरच जनावरांचे मलमूत्र एका हौदात साठवून ते द्राक्ष बागेस वेळोवेळी दिले जाते. द्राक्ष बागेचा एकरी दीड लाखापर्यंत खर्च येतो. खर्च वजा करून पाऊण एकरातून निव्वळ नफा २० लाख रूपये मिळाला. उर्वरित द्राक्ष बागेतून त्यांना भरघोस उत्पन्न मिळणार आहे. जिद्द, टिकाटी, जिज्ञासू वृत्ती आणि कठोर परिश्रम या माध्यमातून त्यांनी शेतीत क्रांती केली आहे. त्यासाठी पारंपिकर शेतीला फाटा देतपाणी, खत आणि मशागतीचे योग्य व्यवथापन, तसेच मिळेल तेथून नवीन गोष्ट शिकवून तो प्रयोग शेतीत करण्यास प्राधान्य दिल्याने उगले यांना चांगला फायदा झाला आहे. द्राक्ष बागेतून त्यांना वर्षभरात सुमारे ८० लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. उगले यांना द्राक्ष शेतीसाठी कुटुंबातील सर्वच सदस्यांची चांगली साथ मिळाल्याने उत्पादनात भर पडली आहे.
३० गुंठे द्राक्षातून २२ लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 1:00 AM