- राहुल टकले (हिंगोली)
रोहिलागड (ता. अंबड, जि. जालना) येथील शेतकरी विष्णू अंबादास पाटील यांनी घरीच छोटे ट्रॅक्टर तयार केले आहे. मोठ्या ट्रॅक्टरला मेंटेनन्सचा खर्च जास्त असतो. शिवाय फळबागांचे क्षेत्र जास्त असल्याने मोठ्या ट्रॅक्टरने काम करणे शक्य नाही. कमी उंची असलेले एखादे यंत्र असेल तर काम सोपे होऊ शकते, या कल्पनेतून त्यांनी छोटे ट्रॅक्टर बनविले आहे.
दुसरी पास असलेल्या पाटील यांना एकूण आठ एकर शेती आहे. फळबागाचे क्षेत्र जास्त असल्याने बैलांच्या सहाय्याने काम करण्यास दिवस घालवावा लागतो. या यंत्रामुळे त्यांचे काम अतिशय सोपे झाले असून, बैलांच्या मदतीने होणारी सर्वच कामे ते या यंत्राच्या सहाय्याने करतात. पाटील यांनी यूट्यूबवर व्हिडिओ बघितले. वेगवेगळ्या पार्टची माहिती घेऊन ते पार्ट गोळा करायला सुरुवात केली. हे सर्व पार्ट गोळा करण्यासाठी त्यांना दोन महिने लागले.
वेगवेगळ्या पार्टसाठी त्यांनी औरंगाबाद, जालना, बीड येथील स्पेअर पार्ट व भंगार दुकानातून सामान खरेदी केले. जास्तीत जास्त सामान भंगार दुकानातून खरेदी केल्यामुळे खर्च कमी आला. स्वत:चे गॅरेज असल्याने रात्रंदिवस मेहनत घेऊन त्यांनी ३ महिन्यांत हा छोटा ट्रॅक्टर उभा केला. त्यामध्ये ५ एच.पी.चे छोटे इंजिन बसविले आहे. पहिल्याच ट्रायलमध्ये मनासारखे काम केल्याने बदल करण्याची गरज पडली नाही, असे पाटील सांगतात.
पाटील नेहमीच शेती नवनवीन यंत्रसामुग्रीच्या मदतीने करतात. शेतीचे काम सोपे होण्यासाठी त्यांचे नवनवीन प्रयोग सतत चालूच असतात. शिवाय सर्व शेतीच्या औजारांची दुरुस्तीही ते स्वत: करतात. यंत्राच्या मदतीने शेती केल्याने सर्वच कामे वेळेत झाल्याने उत्पन्नही भरपूर मिळते. त्यांना वर्षाला डाळिंबातून १० लाख, मोसंबीतून तीन ते चार लाख तर नर्सरीमधून दोन ते अडीच लाखांचे उत्पन्न मिळते. त्यांना असे पंधरा ते वीस लाखांचे उत्पन्न वर्षाला शेतीतून मिळते.