जालना : पैशांचा अतिहव्यास नेहमीच नुकसानीचा खड्डा खोदणारा असतो. झटपट पैसे कमविण्याची अतिहव्यासाची ही झापड डोळ्यावर इतकी असते, की या मोहमायाजालात तो कधी अडकतो, हे कळत नाही. जेव्हा उमजते तेव्हा फार उशीर झालेला असतो. जीडीसी कॉइनच्या आभासी चलनाच्या अशाच एका मायाजालात अनेक जालनेकर अडकले असून, त्यांची जवळपास दाेनशे कोटींची गुंतवणूक धोक्यात आली आहे.जीडीसी कॉइनच्या मुद्द्यावरून सध्या जालना जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. याचे परिणाम राजकीय पटलावर उमटले असून, माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि आ. कैलास गोरंट्याल यांच्यातील वाद विकोपाला गेले असून, आरोप - प्रत्यारोपच्या फैरी झडत आहेत. याच पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांकडे आता तक्रारींचा ओघ वाढला असून, यात तपासासाठी पोलिसांचा कस लागणार आहे.
गेल्या पाच वर्षांपासून उद्योजक किरण खरात हा जीडीसी कॉइन प्रकरणातील प्रमोटर असून, त्याने या जीडीसी कॉइन गुंतवणुकीत कमी पैशांमध्ये अधिकचे व्याज आणि मुद्दलाच्या किमतीतही वाढ होईल, असे सांगून गुंतवणूकदारांची मोठी चेन निर्माण केली. प्रारंभीच्या काळात खरात यांनी सांगितल्यानुसार अनेकांना त्याचा चांगला परतावा मिळाला. या परताव्यातून काहींनी महागड्या गाड्यांसह पर्यटनही केले. परंतु, २५ डिसेंबरला जीडीसी कॉइन लाँच होणार होता. असे असतानाच त्याच दिवशी संपूर्ण जगभरात याचे भाव मंदीमुळे कोसळले आणि गुंतवणूकदारांचे डोळे पांढरे झाले. आभासी चलनाचा श्रीगणेशा हा खऱ्या अर्थाने बिटकॉइन या क्रिप्टो करन्सीतून २००९ मध्ये झाला. नंतर अशा प्रकारच्या आभासी चलनांच्या वेगवेगळ्या ब्लॉकचेन कॉइनच्या २४ हजार करन्सी जगभरात असून, भारतात जवळपास पाच हजार करन्सी सक्रिय आहेत.
या आभासी चलनात देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. यात गोरगरिबांसह श्रीमंतांनीही काही कोटी रुपये गुंतविले आहेत. या चलनाची किंमत मागणी आणि पुरवठा याच समीकरणावर ठरते. खरेदी वाढली की किंमत वाढते आणि खरेदीसाठी इच्छुकांची संख्या घटल्यास किंमत घसरते, असे सांगण्यात आले. त्यात ११ टक्के व्याजाचाही समावेश आहे. हे व्याज जेवढे कॉइन खरेदी केले असतील तेवढ्या कॉइनवर मिळते. आज जरी या चलनाची गुंतवणूक दर कमी झाल्याने धोक्यात आली आहे, असे म्हटले जात असले तरी याचे दर वाढणारच नाहीत ही शक्यता धूसर आहे. केलेली गुंतवणूक मातीमोल होईल, अशी भीती बाळगणेही गैर ठरू शकते, अशी माहिती या क्षेत्रातील अभ्यासक अविनाश कव्हळे यांनी दिली.
गुंतवणुकीवरून राजकीय वाद पेटलाजिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विलासराव खरात यांचा किरण खरात हा पुतण्या आहे. तर यात मोठी गुंतवणूक करणारे क्रिकेटपटू विजय झोल हे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचे जावई आहेत. त्यातच या वादात काँग्रेसचे येथील आमदार कैलास गोरंट्याल यांनी उडी घेतली. ही गोरंट्याल यांची उडी शहरात याच प्रकरणातून किरण खरात यांच्या घरात केलेला गोळीबार तसेच किरण खरात याला पुण्यातून किडनॅप करून त्याला धमकावून त्याच्याकडून विजय झोल, विक्रम झोल यांनी त्यांची मालमत्ता स्वत:च्या नावावर करून घेतल्याने वातावरण बिघडले आणि हे मुद्दे गोरंट्याल यांनी जनतेसमोर मांडले. त्यातूनच आता खोतकर, गोरंट्याल यांच्यात वाद पेटला आहे.
जीडीसी म्हणजे काय?जीडीसी कॉइन ही एक प्रकारची क्रिप्टोकरन्सी आहे. जीडीसी कॉइन हे रुपया, डॉलर किंवा इतर कुठल्याही चलनाप्रमाणे एक चलन असते. फक्त ते ऑनलाइन असते आणि एका काॅम्प्युटर कोडद्वारे एनक्रिप्टेड म्हणजे लॉक केलेले असते. जशा आपल्याला बँकांमधून नोटा मिळतात तसेच इथेही ऑनलाइन साइट्सवर हे चलन तुम्हाला तुमच्याकडच्या पैशातून खरेदी करता येते. ही खरेदी केल्यावर तुमचे एक वॉलेट तयार होते, ज्यात ही करन्सी तुम्ही साठवू शकता. अशी प्रत्येक खरेदी केल्यावर एक नवा ब्लॉक तयार होतो आणि या प्रक्रियेला माईनिंग म्हणतात. जितके जास्त आर्थिक व्यवहार एका ब्लॉकचेनमध्ये होतील, तितके अधिक ब्लॉक बनतील आणि तितकी अधिक माईनिंग होईल, असे पोलिसांनी सांगितले.