फार्मसीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील वरुड येथील सुयश कॉलेज ऑफ फार्मसीचे गुणवंत विद्यार्थी शुभांगी वैद्य, रश्मी जैस्वाल यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संतोष ठाकरे, प्राचार्य डॉ. विजय पवार यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
आजार रोखण्यासाठी उपाययोजना करा
जालना : बदनापूर तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून, त्यामुळे मलेरिया, डेंग्यू असे आजार उद्भवत आहेत, हे आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने तालुक्यात तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस नेते सुधाकर निकाळजे यांनी केली आहे. ग्रामपंचायतीच्या किंवा संस्थांच्या वतीने प्रत्येक गावात धूर फवारणी करणे, पिण्याच्या पाण्याच्या साधनांमध्ये ज्यामध्ये विहिरी, तलाव यात जल शुद्ध करण्याचे द्रव स्वरूपातील पर्याय वापरणे गरजेचे आहे. आरोग्य खात्याने कीटकजन्य आजार रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे निकाळजे यांनी म्हटले आहे.
ई-पीक पाहणी शासकीय यंत्रणेने राबवावी
भोकरदन : ई-पीक पाहणी कार्यक्रम शासकीय यंत्रणेकडूनच राबविण्यात यावा, अशी मागणी बळीराजा फाउंडेशनच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सद्यस्थितीत शेतकऱ्यांनी शेतात लावलेल्या पिकांची पाहणी करण्याकरिता, ई-पीक पाहणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांकडे मोबाईल नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. या निवेदनावर फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे, संदीप भोकरे, अमोल खांडवे, समाधान लोखंडे, राहुल साबळे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नगरसेवक पवार यांचा आंदोलनाचा इशारा
जालना : गेल्या अनेक दिवसांपासून नगर पालिकेतील अधिकारी, कर्मचारी विकासकामांमध्ये अडचणीत आहेत. प्रभाग १३ मध्ये कामे होऊ देत नाहीत. प्रशासनाकडूनही दुर्लक्ष केले जात आहे. वॉर्डात घंटागाडी सुरू न झाल्यास येत्या चार दिवसांमध्ये गांधी चमन भागात धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शिवसेनेचे नगरसेवक विजय पवार यांनी दिला आहे. प्रभागात अनेक समस्या आहेत. समस्यांबाबत वारंवार सर्वसाधारण सभेत आवाज उठविण्यात आला आहे. अनेकदा निवेदनेही दिली आहेत. याकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.
अनाथांना शैक्षणिक साहित्य वाटप
जालना : अनाथ आश्रमातील मुलांना शैक्षणिक साहित्य आणि कपड्याचे वाटप करण्यासाठी नगरसेवक संदीप बाहेकर यांनी पुढाकार घेतला आहे. मराठवाडा मुक्तिदिनाच्या पार्श्वभूमीवर स्नेहांकुरमध्ये राहणाऱ्या ४ विद्यार्थ्यांना संदीप बाहेकर यांनी साहित्य वाटप केले आहे.