गेल्या काही महिन्यांपासून जीएसटीच्या राज्य तसेच सीजीएसटीच्या पथकाकडून व्यापारी, उद्योजकांच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर संशय घेण्यात आला आहे. तसेच येथील स्टील उद्योजकांनी संबंंधित स्क्रॅप खरेदीदाराकडून जीएसटीची बिलेही घेतली; परंतु संबंधित व्यापाऱ्याने जीएसटी विभागाकडे ते न पाठवता तसेच बिल उचलून घेतले. ज्यावेळी येथील व्यापाऱ्यांनी तसेच उद्योजकांनी जीएसटीचा परतावा अर्थात इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी अर्ज केल्यावर मोठी धक्कादायक बाब समोर आली.
संंबंधित व्यापाऱ्याने जीएसटीचे पैसे न भरता आपले व्यवहार बंद केले. त्यामुळे येथील उद्योजकांनी इनपुट टॅक्स क्रेडिट मिळण्यासाठी जो दावा केला होता, तो त्यांना न मिळाल्याने जीएसटीच्या राज्य तसेच सीजीएसटीने थेट खरेदीदार म्हणजेच जालन्यातील स्टील उद्योजकांवर छापे टाकले. त्यांच्या कंपनी तसेच घरांची झाडाझडती घेतली. यात मोठी अनियमितता आढळून आल्याचा संशय असून, आता या अधिकाऱ्यांनी जालन्यातच ठाण मांडून अत्यंत बारकाईने कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. त्यात तुम्ही पाठविलेला उत्पादित माल, समाेरच्याचा पत्ता तसेच त्यांचा जीएसटी क्रमांक, टोल नाक्यावरून ही ट्रक कुठल्या दिवशी गेली तसेच व्यापारी, उद्योजकांनी त्याची नोंद कधी केली आदी बाबींची माहिती हे पथक कंपनीचे लेखापरीक्षक तसेच सीएंकडून घेत आहे. अनेक सीए तसेच कर सल्लागारांशी संपर्क करून त्यांच्याकडून जबाब नोंदविले जात आहेत.
चौकट
एका व्यापाऱ्यावर कारवाई
जालन्यातील एका स्टील व्यापाऱ्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे इनपुट टॅक्स वसूल केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्या व्यापाऱ्यास सीजीएसटीच्या पथकाने अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले होते. त्यांना जामीन मंजूर झाला आहे. हे सर्व व्यवहार कोट्यवधी रुपयांचे असल्याने येथे शंका निर्माण झाली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान गेल्या आठ ते दहा दिवसांपासून हे जीएसटीच्या मुंबईतील पथकाकडून एमआयडीसी तसेच मोंढ्यातील दुकानांवर जाऊन झाडाझडती घेतली असल्याने व्यापारी, उद्योजक हवालदिल झाले आहेत.