लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भोकरदन तालुक्यातील राणी उंचेगाव येथील एका गोडाऊनमधील सात लाख ११ हजार रूपये किमतीचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला. ही कारवाई मंगळवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली असून, यावेळी एकाला जेरबंद करण्यात आले.भोकरदन तालुक्यातील राणी उंचेगाव येथील एका वॉटर फिल्टरच्या गोडाऊनमध्ये अवैधरित्या गुटख्याचा साठा केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. या माहितीवरून स्थागुशाच्या पथकाने मंगळवारी पहाटेच्या सुमारास राणीउंचेगाव येथील गोडाऊनवर कारवाई केली. यावेळी २१ गोण्यांमध्ये पानमसाला, २१ गोण्यांमध्ये जर्दा, गुटख्याच्या पाच बोरी असा एकूण सात लाख ११ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी अब्दुल रियाज अब्दुल रशीद शेख (रा. राणीउंचेगाव) याला ताब्यात घेण्यात आले. कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने पंचनामा करण्यात आला. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरवसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि राजेंद्रसिंह गौर, पोउपनि संदिप सावळे, पोहेकॉ सॅम्युअल कांबळे, पोना गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, पोकॉ सचिन चौधरी, विलास चेके, मनोपा शमशाद पठाण यांच्या पथकाने केली.निर्जन स्थळी प्रशासनाकडून गुटख्याचे दहनकायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस प्रशासन, अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी, पंचांच्या समक्ष जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची होळी करण्यात आली.अन्न सुरक्षा विभागाचे सहायक आयुक्त देसाई, पोनि राजेंद्रसिंह गौर व इतरांची उपस्थिती होती.
सात लाख रुपयांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 12:40 AM