जालना : हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात ठिकठिकाणी गुरुवारी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडत आहे. या बेमोसमी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, शाळू ज्वारी या पिकांसह फळबांगाचे नुकसान झाले. तर मळणीसाठी काढून ठेवलेला गहू, हरभरा, ज्वारी पिकाचे या पावसाने नुकसान केले आहे.
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र कुलाबा मुंबई यांनी दोन दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यात १५ ते १६ मार्च या कालावधीत तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली होती. हा अंदाज खरा ठरला असून, गुरुवारी ताशी ३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वादळी वारे वाहिले. जालना शहरात सकाळी ११ वाजता पावसाची रिमझिम झाली. त्यानंतर मंठा तालुक्यात दुपारी दोन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या पावसात गाराही पडल्या. भोकरदन तालुक्यातही ठिकठिकाणी या पावसाने हजेरी लावली. अवेळी आलेल्या या पावसामुळे शेतात काम करणाऱ्या मजुरांची धावपळ उडाली. तर शेतकऱ्यांची काढलेले पीक झाकण्यासाठी तारांबळ उडाली.
आपत्कालीन परिस्थितीत संपर्क करण्याचे आवाहनवादळी वारे, वीजेपासून आपत्ती ओढावल्यास मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील दुरध्वनी क्रमांक ०२४८२-२२३१३२ यावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.