लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हातील पाचही विधानसभा मतदार संघात २१ आक्टोंबर रोजी मतदान होणार आहे. मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप उपक्रमांतर्गत जिल्हातील अडीच लाख मुले त्यांंच्या पालकांकडून संकल्प पत्र भरुन घेतले जाणार असल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी दीपाली मोतीयाळे यांनी दिली.दीपाली मोतीयाळे म्हणाल्या, जिल्हास्तरावरावरुन तालुकानिहाय संकल्प पत्राचे वाटप करण्यात आले आहे. संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आपल्या अधिनस्त शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांच्या मार्फत ते शाळा शाळांपर्यंत पोहोचविणार आहेत. त्यानंतर शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या मार्फत ते मुलांद्वारे ते पालकांपर्यंत पोहचविले जाणार आहेत. त्यानंतर पालक म्हणजेच मतदार त्या संकल्प पत्रावर आपले व कुटुंबातील सदस्यांची नावे, मोबाईल क्रमांक, विधानसभा मतदार संघाचे नाव, मतदान केंद्र क्रमांक व नाव लिहून ते परत मुलांकडे देतील व ते संबंधित तहसिल कार्यालयात जमा करण्यात येतील. संकल्पपत्र भरून घेण्याशिवाय इतर मतदारांनीही अधिकाधिक प्रमाणात मतदान करावे, यासाठीही जनजागृती केली जात आहे. जिल्हाभरातील विविध शाळेतही अशी जागृती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.स्वीप अंतर्गत उपक्रम : पालकांना घातली जाणार मतदानाची शपथया संकल्प पत्रावर मी मतदान करुन आपला उमेदवार निवडण्याचा माझा फक्त अधिकार नसून ती माझी राष्ट्रीय जबाबदारी आहे. मी अशीही शपथ घेतो की, देशहिताकरिता जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करु शकणाऱ्या सर्वोत्तम उमेदवाराची निवड करण्यासाठी मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना तसेच माझ्या परिचित व्यक्तींना मतदान करण्यासाठी प्रेरित व प्रोत्साहित करीन. तसेच मी कोणत्याही भितीपोटी, लालसेपोटी मतदान करणार नाही. तसेच धर्मनिरपेक्ष भावनेने मतदान करण्याची जबाबदारी मी पार पाडीत असा संदेश या संकल्पपत्रात दिलेला आहे.
अडीच लाख मुले करणार मतदारांची जनजागृती...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 12:51 AM