अंबड : तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांनी रेशन कार्डमध्ये नाव नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह महसूलकडे अर्ज केले आहेत. परंतु, महसूल विभागाकडून योग्य कार्यवाही होत नसल्याने अनेक लाभार्थी लाभापासून वंचित राहत आहेत. या लाभार्थ्यांचे नाव रेशन कार्डमध्ये नोंदवून त्यांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा, या मागणीसाठी पाथरवाला खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य तसेच मानवाधिकार कार्यकर्ता सखाराम घोडके यांनी शुक्रवारी तहसीलच्या पायरीवर अर्धनग्न आंदोलन करीत प्रशासनाचा निषेध नोंदविला.
घोडके यांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. तहसील कार्यालयात रेशन कार्डमध्ये नावे वाढवण्यासाठी अनेकवेळा आधार कार्ड, रेशनकार्ड, त्यासाठी लागणारा अर्ज देऊनही अनेकांची नावे घेतली जात नाहीत. अनेकांची नावे नोंद नसल्याने त्यांना रेशनपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, लाभार्थ्यांची नावे रेशन कार्डवर लावावीत, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी ग्रा.पं. सदस्य दत्ता शेंडगे, राजू काकडे, लालवाडीचे सरपंच संदीप शिंदे, जे.एम. पंडित, गणेश खैरे, सचिन घाडगे, प्रवीण हर्षे, रवींद्र हर्षे, किरण ढवळे, रवींद्र घरड यांच्यासह असंख्य माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
ज्यांची कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत त्यांना रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्यांना मिळाले नसतील त्यांनी पुरवठा विभागाशी संपर्क करावा त्यांना रेशनकार्ड उपलब्ध करून दिले जातील.- विश्वास धर्माधिकारी, नायब तहसीलदार