लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नगरपालिका प्रशासनाने गुरुवारी शिवाजी पुतळा ते टपाल कार्यालय या परिसरातील पक्के बांधकाम, टपऱ्या, अशी ५५ अतिक्रमणे जमीनदोस्त केली. अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.शहरातील महत्त्वाच्या शिवाजी पुतळा ते जिजामाता प्रवेशद्वार या रस्त्यावर दोन्ही बाजूने अतिक्रमण झाले आहे. अनेकांनी पक्के बांधकाम करून रस्त्यावर दुकाने थाटली आहेत. तर काहींनी पत्र्याचे थेड टाकून झेरॉक्स सेंटर, चहा टपरी, हॉटेल्स, डीटीपी सेंटर, सलून, गॅरेज असे व्यवसाय सुरू केले आहेत. या दुकानांसमोर फेरिवाल्यांनी अर्धा रस्ता व्यापून टाकला आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होते. तसेच रस्त्याचे विद्रुपीकरण झाले आहे. अतिक्रमणामुळे अनेकदा वादही घडतात. याबाबत तक्रारी वाढल्या होत्या. तसेच भारत संचार निगम लिमिटेड व टपाल कार्यालयासमोरील अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना नगरपालिका प्रशासनाने दिल्या होत्या. मात्र, अतिक्रमण धारकांनी याकडे दुर्लक्ष केले. वारंवार लेखी व तोडी सूचना देऊनही अतिक्रमणे जैसे थे राहिल्याने नगरपालिका प्रशासनाने गुरुवारी सकाळी सहा वाजता अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. शिवाजी पुतळा चौकापासून पत्र्याचे शेड जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यास सुरुवात केली. या कारवाईमुळे एकच गोंधळ उडाला. अतिक्रमणधारक घाईगडबडीत दुकानांवर पोहचले. सुरुवातीला काहींनी विरोध केला. अधिका-यांनी थाटलेल्या दुकानांची अधिकृत कागदपत्रे देण्यास सांगितले. मात्र, कुठलेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने, पोलीस प्रशासनाच्या अधिका-यांनी अतिक्रमण धारकांना कारवाईत अडथळा न आणण्याच्या सूचना केल्या. पालिकेचे अधिकारी ऐकण्याचा मनस्थितीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अतिक्रमण धारकांनी हाती येईल ते सामान बाहेर काढून टाकण्यास सुरुवात केली. जेसीबीने अतिक्रमण पाडत असताना अनेक दुकानांमधील खुर्च्या, फर्निचर, सिलिंग, फॅन, टेबल तुटले. पत्र्याचे शेडही मोडले. सकाळी सहा ते दुपारी तीनपर्यंत चालेल्या कारवाईत पालिकेच्या पथकाने २५ हून अधिक पक्की अतिक्रमणे पाडली. तसेच पत्र्याचे शेडही हटविले. दिवसभरात एकूण ५५ अतिक्रमणे पाडण्यात आली. त्यामुळे या रस्त्याने मोकळा श्वास घेतला.पालिकेचे नव्वद सफाई कामगार , १२ ट्रक्टर, एक जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमणे पाडून साहित्य जमा करण्यात आले. शहरातील इतर भागातील अतिक्रमण हटविण्यासाठी या पुढेही अशा प्रकारे अचानक कारवाई करण्यात येईल, असे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितले.
५५ अतिक्रमणांवर हातोडा: परिसरात चोख बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:48 AM