जालना : जालना शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांतील जनावरे चोरीमध्ये सिल्लोड (जि. औरंगाबाद) येथील आरोपींचा हात असल्याचे गुन्हे शाखेच्या कारवाईत समोर आले आहे. जालना गुन्हे शाखेने मंगळवारी दुपारी सिल्लोड येथे कारवाई करून दोन संशयितांना ताब्यात घेतले.
जावेद शब्बीर पटेल (रा. इदगाहनगर सिल्लोड) व मोहंमद कुरबान मोहंमद अजीज अन्सारी (रा. धुळे ह. मु. शिक्षक कॉलनी, सिल्लोड) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. जालना तालुक्यातील भिलपुरी शिवारातील जनावरे २५ सप्टेंबर रोजी रात्री चाेरून पळवून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यांची जीप चिखलात फसली होती. त्या वेळी ग्रामस्थांनी वाहनासह जनावरे ताब्यात घेत पोलिसांना माहिती दिली. परंतु, अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार झाले होते. या प्रकरणात मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या जनावरे चोरीमध्ये सिल्लोड येथील दोघांचा हात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. पथकाने मंगळवारी दुपारी कारवाई करून जावेद पटेल, मोहंमद कुरबान मोहंमद अजीज अन्सारी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर इतर सहकाऱ्यांच्या मदतीने चोरीची कबुली त्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुभाष भुजंग, पोउपनि प्रमोद बोंडले, हवालदार प्रशांत देशमुख, गोकुळसिंग कायटे, कृष्णा तंगे, रुस्तुम जैवाळ, सुधीर वाघमारे यांच्या पथकाने केली.
चौकट
मोकाट जनावरांवर डोळा
जालना शहरासह परिसरात मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे जनावरे चोरणे सोपे होत होते. ही बाब पाहता या चोरट्यांनी जालना शहर व परिसरातील मोकाट जनावरे चोरण्याकडे मोर्चा वळविल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
दोन दिवसांची पोलीस कोठडी
गुन्हे शाखेने जेरबंद केलेल्या संशयितांना मौजपुरी पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आले होते. मौजपुरी ठाण्याचे सपोनि. विलास मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन्ही संशयितांना बुधवारी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संबंधित संशयित आरोपींकडून जनावरे चोरीच्या इतर घटनांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.