हसनाबाद : जिद्द आणि मेहनतीची तयारी असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. हे मनोज लाठी या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. लाठी यांनी पाच एकर पडीत जमिनीवर सेंद्रिय पद्धतीने पेरूची बाग फुलवून त्यातून भरघोस उत्पन्न मिळवले आहे. त्यांच्या बागेतील पेरूची पहिली खेप गुजरात राज्यातील सुरत येथे रवाना झाली असून, २३ टन माल पाठवण्यात आला आहे. आणखी २०० टन माल परराज्यातील शहरांत पाठविण्यात येणार आहे.
येथील शेतकरी मनोज लाठी यांनी शिवारात पाच एकर शेती आहे. मात्र २०१७ मध्ये ती शेती पडीत होती. मात्र, पारंपरिक पिकांऐवजी फळबाग लावण्याचा निर्णय लाठी यांनी घेतला. त्यांनी सहा वर्षांपूर्वी व्हीएनआर जातीची १ हजार पेरूच्या झाडांची बाग लावली. त्यांनी या जातीची रोपे छत्तीसगड येथून मागवले होते.
सेंद्रिय फळांना मागणीरासायनिक औषधांचा वापर करून पिकवलेल्या फळांपेक्षा सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या फळांना बाजारपेठेत चांगली मागणी असल्याचे मनोज लाठी यांना समजले. त्यांनी छत्तीसगड येथून साठ रुपये याप्रमाणे रोपे मागवली. मनाेज लाठी यांचे बंधू दिलीप लाठी हे पुणे येथे राहतात. त्यांनी मनोज लाठी यांना पेरूच्या फळबागीविषयी मार्गदर्शन केले. लाठी यांनी पेरू लागवडीसाठी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केल्यामुळे फळाचा दर्जा उत्तम राखण्यात त्यांना यश आले आहे. त्यांचा मुलगा प्रफुल्ल लाठी याची त्यांना मोलाची साथ मिळाली.
दोनशे टन उत्पादनाची अपेक्षाकोणतेही रसायनिक खत न वापरता शेणाची सलरी, दशपर्णी अर्क, लिंबोळी अर्क वापरून त्यांनी आपली फळबाग जोपासली आहे. पेरूच्या उत्पादनातून त्यांना सुमारे दोनशे टन उत्पादनाची अपेक्षा आहे. फळ लागवडीपासून ते तोडणीपर्यंत त्यांनी योग्य निगा राखल्यामुळे एका फळाचे वजन ५०० ते ७०० ग्राम एवढे आले आहे. फळ दीर्घकाळ टिकण्यासाठी आकर्षक पॅकिंग केल्यामुळे अनेक ठिकाणांहून ऑर्डर मिळू लागल्या आहेत.
शेतात पाहणीशासनाच्या महात्मा फुले स्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेडचे व्यवस्थापक गणेश चौधरी यांनी मनोज लाठी यांच्या पेरूबागेची पाहणी केली. दुष्काळीस्थिती असूनही योग्य नियोजन करून त्यांनी फळबाग जोपासली आहे. चोख हिशोब ठेवल्याने तोट्यात जाणारा शेती व्यवसाय त्यांनी नफ्यात आणून दाखवला आहे. याची दखल घेऊन फळबागेची पाहणी केली असल्याचे गणेश चौधरी यांनी सांगितले.
कर्नाटकातून मागणीसेंद्रिय पेरूला देशातील विविध भागांमध्ये मोठी मागणी आहे. मनोज लाठी यांनादेखील विविध शहरांमधून ऑर्डर येत आहेत. पहिली खेप सुरतकडे रवाना झाल्यानंतर येत्या काही दिवसांत बेंगळुरूसह उत्तर प्रदेशात पेरू पाठवणार असल्याचे मनोज लाठी यांनी सांगितले.