अनिस यासीन बेग मिर्झा व रहिस मिर्झा हे दोघे एमसीएन प्रा.लि. या कंपनीत काम करीत होते. त्याचबरोबर, ते स्वत:चे अमन केबल नेटवर्क चालवित आहे. ते ठिकठिकाणी सॅटेटॉप बॉक्स बसविण्याचे काम करतात. याबाबत कंपनीने त्यांच्याबरोबर करार केला होता. त्यांना जवळपास २ हजार सेटटॉप बाक्स देण्यात आले. त्यानंतर, इतर साहित्यासह रोख रक्कम १ लाख ८० हजार रुपये देण्यात आले होते, परंतु त्यांनी काम पूर्ण केले नाही. त्यांच्याकडे साहित्य व पैशांची मागणी केली असता, टाळाटाळ करून विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली जात होती, तसेच कंपनीतील गोपनीय माहितीही त्यांनी लिक केली. या प्रकरणी अमोल गोकुळ परदेशी (२९) यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अनिस यासिन बेग मिर्झा, रहीस मिर्झा (दोघे रा. गांधीचमन जुना जालना) यांच्याविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी अनिस यासिन बेग मिर्झा यास ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी केली जात आहे. पुढील तपास सपोनि. बनसोड व पोलीस अंमलदार विठ्ठल खार्डे हे करीत आहेत.