जालना / तीर्थपुरी : गोदावरी नदीवर चार बॅरेजेस बांधले. त्यामुळे सिंचनाखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. आपण केलेल्या जलसंधारणाच्या इतर कामांचाही शेतीला लाभ होत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी कै. अंकुशराव टोपे यांनी दूरदृष्टी ठेऊन कारखान्याची उभारणी केल्यचे प्रतिपादन माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी तीर्थपुरी येथे आयोजित कार्यक्रमात केले.यावेळी सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे, अविनाश धायगुडे, उत्तमराव पवार, अमरसिंह खरात, ज्ञानदेव मुळे, तात्यासाहेब उढाण, महेंद्र पवार, जयमंगल जाधव, तात्यासाहेब चिमणे यांची प्रमुख उपस्थिती होती. टोपे म्हणाले, तीर्थपुरी परिसरातील शेतक-यांसाठी साखर कारखानदारी निर्माण केली. त्यासाठी गोदावरीवर चार बॅरेजेस बांधले. त्यामधून पाणी उपलब्ध करून दिले. त्यासाठी लागणारी वीज निर्माण करून दिली. विजेसाठी मोठ्या प्रमाणात ३३ केव्ही उपकेंद्र निर्माण केले. एवढ्यावर न थांबता १३२ केव्ही उपकेंद्र तीर्थपुरीसाठी मंजूर केले. सिंचनाचे काम मोठ्या प्रमाणात झाले. तीर्थपुरीच्या विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील असून, येथील महाविद्यालयाची इमारत उभी करून त्यामधून गरजून मुलांना सर्व शाखेचे शिक्षण दिले जाते. यामधून कौशल्य विकास केंद्र सुरू करून बेरोजगारांना रोजगार किंवा नोकरी मिळण्याचे काम येत्या सहा महिन्यात केले जाणार आहे. विरोधी उमेदवार गुत्तेदारीसाठी राजकारण करीत असून, मतदारांनी भूलथापांना न भूलता विकास कामांसाठी पुन्हा एकदा विधानसभेत काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन टोपे यांनी केले.
घनसावंगी मतदार संघातील शेती, वीज, सिंचनासह इतर क्षेत्रात भरीव कामे केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:34 AM
शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी कै. अंकुशराव टोपे यांनी दूरदृष्टी ठेऊन कारखान्याची उभारणी केल्यचे प्रतिपादन माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी तीर्थपुरी येथे आयोजित कार्यक्रमात केले.
ठळक मुद्देराजेश टोपे : कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती