जालना जिल्ह्याचा विचार केल्यास महिन्याभरापासून जिल्ह्यात एकूण ५८ रूग्ण आढळून आले असून, त्यातील निम्मे रूग्ण हे जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर अन्य रूग्णांवर येथील दीपक हॉस्पिटल, स्वामी विवेकानंद हॉस्पिटल आणि जालना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हे सर्व उपचार महात्मा ज्योतीराव फुले योजनेतून मोफत केले जात आहेत. त्यातही या आजारावर प्रभावशाली असलेली औषधी आता बऱ्यापैकी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. ओठांजवळ अथवा डोळ्याच्या खाली काळी वलये दिसू लागताच त्याकडे दुर्लक्ष न करता, त्याची माहिती डॉक्टरांना द्यावी तसेच त्याकडे दुर्लक्ष करू नये असे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रताप घोडके यांनी केले.
तीन डॉक्टरांना विशेष प्रशिक्षण
जालना येथील कान, नाक आणि घसा तज्ज्ञ अनिल पवार, डॉ. कीर्ती कराडकर, तसेच नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. विभा भिवटे यांचा त्यात समावेश आहे. या तिन्ही डॉक्टरांना औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे. ते तेथून आल्यावर येथील रूग्णांवर उपचार करणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केलेला असून, तेथे स्वतंत्र शस्त्रक्रियागारही स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. घोडके यांनी दिली.
चौकट
घ्यावयाची काळजी
डोळ्याखाली काळे डाग दिसू लागताच तज्ज्ञांकडून तपासणी करणे,
डोळ्यावर सूज येईपर्यंत वाट न पाहणे
काळे डाग दिसल्यावर त्याचा मानसिक ताण न घेता काळजी घ्यावी
म्युकरमायकोसिस हा आजार पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे घाबरून जाऊ नये
महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून रूग्णांवर सर्व उपचार हे मोफत केले जात आहेत.