लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : मंठा तालुक्यातील बेलोरा येथील प्राथमिक आरोग्य संचातील आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे तळणी प्राथमिक आरोग्य केंद्राचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या बेलोरा ग्रामस्थांनी हा अतिरिक्तपदभार देऊ नये, अशी मागणी करीत शनिवारी दुपारी आरोग्य कर्मचा-यांनाच रूग्णालयात कोंडले.बेलोरा येथील प्राथमिक आरोग्य संचातून येथील गावासह परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा दिली जाते. मात्र, या संचातील परिचर एल. ए. फुपाटे, ए. एल. फुपाटे, औषध निर्माता पी. एच. चव्हाण यांच्यासह वैद्यकिय अधिकारी डॉ. शिवराज सुर्यवंशी यांना तळणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. नियुक्ती आदेश जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिले असून, तळणी येथेही आरोग्य सेवा द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा आरोग्य अधिका-यांनी हे आदेश रद्द करावेत, या मागणीसाठी बेलोरा ग्रामस्थांनी शनिवारी दुपारी आरोग्य संचातील कर्मचा-यांना इमारतीत कोंडून रोष व्यक्त केला. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जावेद अली सय्यद यांना विचारले असता, ते म्हणाले, बेलोरा येथील ग्रामस्थांनी आरोग्य कर्मचा-यांना कोंडल्याची घटना खरी आहे. परंतु, वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली जाणार असून, लवकरच निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.दरम्यान, दहिफळ खंदारे, ठोकसाळ व बेलोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील जे आरोग्य कर्मचारी नागरिकांना आरोग्य सेवा देण्यात अकार्यक्षम ठरलेले ‘त्या’ आरोग्य कर्मचा-यांना तळणी प्राथमिक आरोग्य केंद्राचा अतिरिक्त पदभार दिल्याने तळणीकरांनीही नाराजी व्यक्त केली आहे.यांना नियुक्तीचे आदेशतळणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बेलोरा येथील डॉ. शिवराज सूर्यवंशी, परिचर एल. ए. फुपाटे, ए. एल. फुपाटे, औषधी निर्माता पी. एच. चव्हाण, दहिफळ खंदारे येथील प्रा. आ. केंद्रातील आरोग्य सहायक एच. एन. इकडे, ठोकसाळ येथील प्रा.आ. केंद्रातील कनिष्ठ सहायक एम. व्ही. नाईक यांना अतिरिक्त पदभार दिलेला आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांना कोंडले इमारतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:36 AM