जालना : जिल्ह्याच्या विविध भागांत शुक्रवारी दुपारीही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. या पावसाचा फळपिकांसह रब्बीतील पिकांनाही फटका बसला आहे. बदनापूर तालुक्यातील मानेवाडी शिवारात कोंबड्यांची २०० पिले ठार झाली, तर सागरवाडी शिवारात एका गायीचाही मृत्यू झाला आहे.
जालना शहरासह तालुक्याच्या विविध भागांत शुक्रवारी दुपारी पाऊस झाला. बदनापूर तालुक्यातील सागरवाडी शिवारात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसात वीज पडल्याने, जीवन दौलत खोकड यांची गाय ठार झाली, तर वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि पावसाचा मारा झाल्याने मानेवाडी रामधन खोकड यांच्याकडील कोंबड्यांची २०० पिले ठार झाली. या दोन्ही घटनांचा तलाठी सरला मरमट यांनी पंचनामा केला. भोकरदन शहरासह तालुक्यातील केदारखेडा, राजूर परिसरातही पाऊस झाला. जाफराबाद शहरासह तालुक्यालाही पावसाने झोडपून काढले.
वादळी वाऱ्यामुळे सोलर पॅनलचे नुकसानकुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील बंगलेवाडी येथील शेतकरी कलाबाई दशरथ गव्हाणे यांच्या शेतातील कृषिपंपाच्या सोलार पाट्यांचे वादळी वारा व गारपिटीमुळे नुकसान झाले. बुधवारी दुपारी आलेले वादळ आणि पावसासोबत पडलेल्या गारांमुळे कलाबाई गव्हाणे यांच्या भेंडाळा तांडा शिवारातील शेतातील सोलर पॅनलचे नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या मिरची, मका पिकावर पाणीवडोद तांगडा : वडोदतांगडा व परिसरात शुक्रवारी दुपारी अवकाळी पाऊस झाला. या भागातील मिरची, मका पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे, शिवाय कडबा भिजल्याने नुकसान झाले आहे. या भागात जोरदार पाऊस झाल्याने नाले, ओढे भरून वाहिले.
राणीउंचेगाव परिसरात मोसंबीची फळगळराणीउंचेगांव : घनसावंगी तालुक्यात मागील पाच दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे मोसंबीच्या अंबिया बहरातील फळाची गळ होत असल्याने, शेतकरी हवालदिल झाले आहेत. तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव, राणीउंचेगांव परिसराला अवकाळीचा तडाखा बसला आहे. राणीउंचेगाव परिसरात शुक्रवारी दोन तास पाऊस झाल्याने नुकसान झाले. वादळी वाऱ्यात घरावरील, शाळेवरील पत्रे उडाली, तसेच झाडेही उन्मळून पडली होती.