हिवराळे यांची निवड
जालना : भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या बदनापूर तालुका युवक आघाडीच्या बदनापूर तालुकाध्यक्षपदी प्रतीक हिवराळे यांची निवड करण्यात आली आहे. प्रमोदकुमार रत्नपारखे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले आहे. या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे.
पावसाळ्यापूर्वीच्या कामाला सुरुवात
जालना : पावसाळा सुरू होऊन महिना होत आला, तरी महावितरणकडून कामे सुरू करण्यात आली नव्हती. महावितरण कंपनीने पावसाळ्यापूर्वी कामे सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेऊन महावितरणकडून विद्युत प्रवाह करणाऱ्या वीज वाहिन्यांजवळील झाडाच्या फांद्यासह वेलींची छाटणी करण्यात आली आहे. यावेळी महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते.
बाजारात सूचनांचे उल्लंघन सुरूच
जाफराबाद : काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, शासनाने निर्बंध पुन्हा कडक केले आहेत, परंतु जाफराबाद शहरातील बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी येणारे अनेक नागरिक विनामास्क फिरत आहेत, शिवाय सुरक्षित अंतराच्या नियमालाही तिलांजली दिली जात आहे. काही दुकानदारही प्रशासकीय सूचनांचे उल्लंघन करीत आहेत. ही बाब पाहता, प्रशासनाने कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
डावरगाव येथे वृक्षारोपण
अंबड : अंबड तालुक्यातील डावरगाव येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अंबडचे उपनगराध्यक्ष जाकेर डावरगावकर, पारू राठोड, मुख्याध्यापक खरात, राजू जिगे, कानडे, रामप्रसाद वाघ, श्यामसुंदर वाघ, आबासाहेब काळे, पवन उघडे, सचिन धुपे, गौतम उघडे, सुनील गायकवाड, रामजी धुपे, योगेश उघडे, खरात आदींची उपस्थिती होती.
शहराध्यक्षपदी योगिता टकले यांची निवड
अंबड : राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी योगिता टकले यांची निवड करण्यात आली. पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. जिल्हाध्यक्ष सुरेखा लहाने यांनी ही नियुक्ती केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निसार देशमुख उपस्थित होते. या निवडीचे सभापती प्रभा गायकवाड, सुचिता शिनगारे, मीना अटळ आदींनी स्वागत केले.
वरुड परिसरात मुसळधार पाऊस
जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक परिसरात मोठ्या प्रतीक्षेनंतर सोमवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. जूनच्या प्रारंभीपासून ऊन सावल्यांचा खेळ सुरू होता. कधी चांगले ढग दाटून येऊनही पाऊस पडत नव्हता. शेतकरी हतबल होऊन पावसाची चातकासारखी वाट पाहत होते. मृग नक्षत्र संपूनही पाऊस नसल्याने खरीप पेरणी थांबली होती. आता सर्वत्र पाऊस पडला आहे.
पिंपरखेडा येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
मंठा : कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत कृषी विभागाच्या वतीने २२ जून ते १ जुलैच्या दरम्यान थेट शेतावर जाऊन सोयाबीन बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात पिंपरखेडा येथे आत्माचे तालुका व्यवस्थापक आर.एम. मोहाडे व रोहन कोहिरे, कृषी सहायक आर.आर. खांबे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सोयाबीन पिकाची पेरणी जोड ओळीवर कशी करावी, यावर मार्गदर्शन करण्यात आले.