गोवंशाची वाहतूक करणारी जीप पकडली
अंबड : शहरातील पाचोड नाक्यावर बुधवारी दुपारी संशयित विठ्ठल भगवान विडुळे (रा. पंचमबा, ता. रिसोड) यास जीपमधून चार गोवंशाची वाहतूक करताना पोलिसांनी पकडले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस हेड काॅन्स्टेबल विष्णू चव्हाण हे करीत आहेत.
मोकाट जनावरांकडून कोवळी झाडे फस्त
वालसावंगी : काही दिवसांपूर्वीच येथील वालसावंगी फाटा रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वृक्षारोपण करण्यात आले होते. मात्र, देखभाल अभावी मोकाट जनावरांनी येथील कोवळी झाडे फस्त केली आहे. काही वृक्ष आडवी पडली आहेत. वास्तविक पाहता वृक्षारोपण नंतर संरक्षक जाळी बसवून देखभाल करणे गरजेचे आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
सततच्या पावसामुळे शेतीची कामे ठप्प
परतूर : परतूर तालुक्यात दहा ते १५ दिवसाच्या उघडी नंतर पडलेल्या पावसाने खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मूग या पिकांची वाढ देखील चांगली झाली आहे. परंतु, सततच्या पावसाने पीक आंतर मशागत व खताचा डोस देण्याचे काम ठप्प झाले आहेत. तालुक्यात सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली असून, पीक वाढीच्या अवस्थेत आहे. परंतु, सततच्या पावसाने पिकात तण वाढले आहे. तण काढण्यासाठी जास्तीची मंजुरी देऊन देखील मजूर मिळत नाही.
कर्जासाठी आ. कुचेंची आढावा बैठक
बदनापूर : शेतकऱ्यांना खरीप हंगाम पीककर्ज वाटपासंदर्भात आ. नारायण कुचे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व बॅकांच्या शाखाधिकाऱ्यांची आढावा बैठक तहसील कार्यालयात झाली. यावेळी जिल्हा उपनिबंधक चव्हाण, तहसीलदार छाया पवार, तालुका उपनिबंधक भारती ठाकूर, हरिश्चंद्र शिंदे, भगवान मात्रे, गोविंद नन्नवर यांची उपस्थिती होती.
अघडराव सावंगी येथे वृक्षारोपण
भोकरदन : भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथे बकरी ईद निमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच सत्तार बागवान, उपसरपंच प्रकाश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शंगर राऊत यांचे व्याख्यान
जालना : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जालना जिल्हा सांस्कृतिक अभिव्यक्ती कार्यवाह कीर्तनकार शंकर राऊत यांचे ऑनलाईन व्याख्यान झाले. राऊत यांनी यावेळी संताचे विचार आणि अंधश्रद्धा व संतांची भूमिका आणि युवक या विषयाच्या अनुषंगाने संतांच्या विविध अभंगाच्या आधारे समाजातील विविध कर्मकांड व अंधश्रद्धा यावर प्रकाश टाकला. यावेळी सुशील शेळके, अतुल बडवे, वैशाली सरदार, ज्योती आडेकर, विद्या जाधव, माया सुतार, सोनाली शेळके, सिद्धार्थ वाहुळे, रंगनाथ खरात, बालाजी मुंडे, रंगनाथ खरात, पूजा काळे आदींची उपस्थिती होती.