जालना : जिल्ह्यात बुधवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासांत तब्बल ३६.६० मिमी पाऊस झाला. त्यात जिल्ह्यातील आठ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली असून, या मंडळातील खरिपातील उरल्यासुरल्या पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गत तीन दिवसांपासून जिल्ह्यातील पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये अतिवृष्टी होत असल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. उसासह फळबागांवरही या पावसाचा विपरित परिणाम झाला आहे. नुकसानीचे पंचनामे काही भागात सुरू आहेत. परंतु, सतत पडणाऱ्या पावसामुळे या पंचनाम्याच्या प्रक्रियेत अडथळे येत आहेत. जिल्ह्यात बुधवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासांतही दमदार पाऊस झाला तर आठ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. यात भोकरदन तालुक्यातील केदारखेडा मंडळात ८५.३ मिमी, जाफराबाद मंडळात ८४.८ मिमी, कुंभारझरी मंडळात ८६.३ मिमी, टेंभुर्णी मंडळात ७३.३ मिमी, वरूड मंडळात ९५.८ मिमी पाऊस झाला आहे. जालना तालुक्यातील रामनगर मंडळात ६७.८ मिमी, बदनापूर मंडळात ८४.५ मिमी, रोषणगाव मंडळात ८२.८ मिमी पाऊस झाला आहे. सातत्याने अतिवृष्टी होत असल्याने या भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून सर्वच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
जिल्ह्यात १५७.९७ टक्के पाऊस
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत ६०३.१० मिमी पाऊस होणे अपेक्षित असून, आजवर ९१६.१० मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या १५७.९७ टक्के पाऊस झाला आहे. याच कालावधीत गतवर्षी १४८.२७ टक्के पाऊस झाला होता. ही आकडेवारी पाहता मागील वर्षीपेक्षाही यंदा अधिक पाऊस झाल्याचे दिसत आहे.
अंबड तालुक्यात सर्वाधिक हजेरी
अंबड तालुक्यात आजवर सर्वाधिक तब्बल १८८.२३ टक्के पाऊस झाला आहे. तर जालना तालुक्यात १५२.३१ टक्के, बदनापूर तालुक्यात १४२.५३ टक्के, भोकरदन तालुक्यात १५०.०६ टक्के, जाफराबाद तालुक्यात १३४.४२ टक्के, परतूर तालुक्यात १४९.५५ टक्के, मंठा तालुक्यात १४५.७७ टक्के तर घनसावंगी तालुक्यात आजवर १६७.६२ टक्के पाऊस झाला आहे.