जालना : जिल्ह्यातील बहुतांश भागात सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटेच्या सुमारास दमदार पाऊस झाला. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्या यंदा प्रथमच तुडुंब भरून वाहत होत्या, तर प्रकल्पातील पाणीसाठ्यातही पाण्याची आवक सुरू झाली आहे. परंतु, या पावसाचा खरिपातील पिकांनाही फटका बसला आहे.
जालना जिल्ह्यात शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. परंतु, दमदार पाऊस झाला नसल्याने नदी- नाल्यांसह प्रकल्पांची तहान कायम होती. सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटेच्या सुमारास जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे शहरी, ग्रामीण भागातील सखल भागात राहणाऱ्या अनेकांच्या घरांत पाणी शिरले. शिवाय दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. गोदावरी नदीपात्रातील जोगलादेवी, मंगरुळ, राजाटाकळी, शिवनगाव बंधारे भरल्याने ५० हजार क्युसेकसने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीही दुथडी वाहत आहे.
दमदार पावसामुळे तीर्थपुरी ते कुंभार पिंपळगाव रस्त्यावरील स्मशानभूमीजवळील नळकांडी पूल वाहून गेला, तसेच खालापुरीजवळील बहिरी नदीला पूर आल्याने संपूर्ण वाहतूक बंद होती. तीर्थपुरी ते अंबड व शहागड रोडवरील खडकी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे पन्नासहून अधिक गावांचा संपर्क तुटला होता.
फोटो कॅप्शन : घनसावंगी तालुक्यातील शिवनगाव शिवारातील बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग.
(फोटो जेएनपीएच ०२)