जालना : यंदा पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यातील ६४ पैकी ४५ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. या प्रकल्पांमध्ये एकूण ८८.९८ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला असून, आगामी काळातील पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. शिवाय रबी हंगामात शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्नही मिटला आहे.
यंदा पावसाळ्याच्या प्रारंभीपासूनच जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. शेवटच्या टप्प्यातही पावसाचा जोर कायम राहिल्याने जिल्ह्यातील नदी, नाले, ओढे दुथडी वाहिले. परिणामी जिल्ह्यातील ६४ पैकी ४५ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. तर चार प्रकल्पात अद्यापही मृत पाणीसाठा असून, चार प्रकल्पात २५ टक्क्यांपर्यंत उपयुक्त पाणीसाठा आहे. पाच प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्क्यांच्या मध्ये उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तर सहा प्रकल्पांमध्ये ७६ ते १०० टक्क्यांच्या मध्ये पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील कल्याण गिरजा, कल्याण मध्यम, अप्पर दुधना, जुई, धामना, जिवरेखा, गल्हाटी हे सातही मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
मध्यम प्रकल्पांची स्थिती पाहता जालना तालुक्यातील दरेगाव, जामवाडी, नेर, वाकी, निरखेड तांडा, वानडगाव, पिंपळवाडी, कुंभेफळ, बदनापूर तालुक्यातील आन्वी, भोकरदन तालुक्यातील प्रल्हादपूर, पिंपळकाव कोलते, चांदई एक्को, पळसखेडा, बाणेगाव, रेलगाववाडी, जाफराबाद तालुक्यातील कोनड, भारज, चिंचखेडा, शिंदी, अंबड तालुक्यातील डावरगाव, रोहिलागड, कानडगाव, भातखेडा, सुखापुरी, टाका, लासुरा हे प्रकल्प भरले आहेत. तर घनसावंगी तालुक्यातील तळेगाव, म. चिंचोली, दहेगाव, बोररांजणी, परतूर तालुक्यातील नागथस, बामणी, मंठा तालुक्यातील पांगरी, पोखरी, पिंपरखेडा, शिरपूर, सारवाडी, दहा, वाई आदी प्रकल्प तुडूंब भरले आहेत. दरम्यान, गत अनेक वर्षानंतर जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करून वापर होणे गरजेचे आहे.
लघु प्रकलपात ८४.४ टक्के साठाजिल्ह्यातील लघु प्रकल्पांमध्ये ८४.४ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तर सात मध्यम प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. एकूणच मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शहरी, ग्रामीण भागाचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. शिवाय आगामी रबी हंगामातील शेती सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागला आहे.