जालना : रोटरी क्लबचे कार्य उल्लेखनीय असून, त्याला पुढे न्यायचे आहे. आरोग्य क्षेत्रात ‘रोटरी’च्यावतीने जे उपक्रम राबविले जातील त्याला संपूर्ण राज्यात आवश्यक ती मदत केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
रोटरी क्लब ॲाफ जालना सेंट्रलच्यावतीने रविवारी कोरोना संवेदनवीर सन्मान सोहळ्यात टोपे बोलत होते. व्यासपीठावर नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, रोटरी झोनल कोऑर्डिनेटर डॉ. राजीव प्रधान, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हरीश मोटवाणी, अध्यक्ष सुरेंद्र मुनोत, परेश रायठ्ठा यांची प्रमुख उपस्थिती होती.
जालन्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयाची जागा निश्चित झाली आहे. लवकरच आयुष रुग्णालय आणि अद्ययावत वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. ४०० खाटांचे जिल्हा रुग्णालय उपलब्ध झाल्यास वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊ शकते. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे सोपे असले तरी यासाठी तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचारी, दर्जेदार ग्रंथालय, प्रयोगशाळा यासह अद्ययावत उपकरणे लागतात. त्यामुळे योग्य तो विचार करूनच वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले जाईल. जिल्हा रुग्णालयात एमआयआर मशीन दिली असून, आता कॅथलॅब व रेडिएशन सुविधा आणायची आहे. त्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर उपचार करणे शक्य होणार आहे. तसेच जिल्हा रुग्णालयास कॉपोर्रेट लूक देत असून, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे टोपे यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्यासह डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास उद्योजक घनश्याम गोयल, डॉ. राजेंद्र बारवाले, सुरेश अग्रवाल, समीर अग्रवाल, रामकिसन मुंदडा आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. स्वप्नील बडजाते, डॉ. सोनाली जेथलिया यांनी केले तर परेश रायठ्ठा यांनी उपस्थितांचे आभार मानले.
(फोटो)