त्यांच्यावर उपचार करून त्यांना नवीन आयुष्य देण्यासाठी कोरोना रुग्णालयातील तरुण डॉक्टरांची टीम जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, डॉ. घाडके, डॉ. चव्हाण यांच्यासह कोरोनातज्ज्ञ डॉ. आशिष राठोड, डॉ. प्रशांत बांदल, डॉ. उमेश जाधव, डॉ. उमेश वैष्णव यांनी त्या आजीवर विविध वैद्यकीय पद्धतीने इलाज केले. रेमडेसिविरचाही उपयोग केला, तसेच ऑक्सिजनचे शरिरातील प्रमाण वाढविण्यासाठी आजीला दररोज किमान दिवसातून दोन ते तीन तास पालथे झोपण्यास सांगितले. त्या आजीनेदेखील डॉक्टरांच्या सूचनांचे तंतोतंत पालन केल्यानेच त्यांनी १२ दिवसात कोरोनावर मात करून एक प्रकारे कोरोनाविरुद्धचे युद्धच जिंकले, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
आयुक्तांकडून कौतुक
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे गुरुवारी जालन्यात आले होते. त्यांनी विविध संस्था, उद्योगांना भेटी देऊन कोरोना संदर्भातील सूचना दिल्या, तसेच या यवतमाळ येथील देऊबाई जायभाये यांनी कोरोनावर मिळविलेल्या विजयाबद्दल त्यांचे तोंडभरून कौतुक केले; परंतु हा दौरा खासगी होता असे सांगण्यास ते विसरले नाहीत. त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे हे देखील होते. यावेळी जिल्हा शल्यचिकत्सकांनी आयुक्त केंद्रेंकरांना सर्व ती माहिती दिली. या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुण घाबरून जात असताना या आजीच्या इच्छाशक्तीला सर्वांनी दाद देऊन टाळ्यांच्या गजरात आजीला गुरुवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आल्याने सर्वत्र उत्साह दिसून येत होता.