जालना : ओबीडी डिव्हाईसच्या मदतीने सेन्सर बंद करून स्क्रू ड्रायव्हर आणि बनावट चावीच्या मदतीने चारचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुलडाणा जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. शेख अफजल शेख दाऊद (२२), शेख दाऊद ऊर्फ बब्बू शेख मंजूर (५६), शेख राजा शेख दाऊद (२४), अरबाज शेख दाऊद (१८ रा. सर्व गुलशननगर चिखली, जि. बुलडाणा), शेख फरदीन शेख युसूफ (१९ रा. संजयनगर देऊळगावराजा) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून स्वीफ्ट डिझायर कार, गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी, ओबीडी डिव्हाईस, बनावट चाव्या, स्क्रू ड्रायव्हर असा एकूण ९ लाख ७९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पंजाब पवार यांची जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातून चारचाकी चोरी गेली होती. या प्रकरणी सदर बाजार ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करीत असताना, सदर गुन्हा हा शेख अफजल शेख दाऊद याने साथीदारांच्या मदतीने केल्याचे पोलिसांना समजले. या माहितीवरून पोलिसांनी बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांना सदरील गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनासाठी पोनि. रामेश्वर खनाळ, सपोनि. आशिष खांडेकर, पोउपनि. प्रमोद बोंडले, पोउपनि. राजेंद्र वाघ, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, भाऊराव गायके, राम पव्हरे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, रूस्तुम जैवाळ, जगदीश बावणे, रमेश राठोड, सचिन चौधरी, सागर बाविस्कर, लक्ष्मीकांत आडेप, सतीश श्रीवास, देवीदास भोजने, किशोर पुंगळे, रवी जाधव, भागवत खरात, योगेश सहाने, सचिन राऊत, संजय राऊत, सौरभ राऊत यांनी केली आहे.