जालना : सदोष मनुष्य वध प्रकरणातील आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरी व चार हजार रुपये दंडाची शिक्षा, तर अन्य एकास खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायधीश बी. एस. गारे यांनी गुरुवारी सुनावली आहे. प्रल्हाद रामदास मिसाळ व विलास रामदास मिसाळ अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
४ ऑक्टोबर २०२० रोजी रामदास जोशी व योगेश जोशी यांना जुन्या शेतीच्या वादातून मारहाण करण्यात आली होती. आरोपी विलास मिसाळ याने त्याच्या ट्रॅक्टरने योगेश जोशी यांना जोराचा धक्का दिल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. आरोपी प्रल्हाद मिसाळ याने रामदास जोशी यांच्या डोक्यात धारदार कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले. जोशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी हसनाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सरकार पक्षाच्यावतीने एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी व जखमी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपासिक अंमलदार पोलिस उपनिरीक्षक जी. एन. पठाण यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर व समोर आलेल्या साक्षीपुराव्यावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एस. गारे यांनी आरोपी प्रल्हाद मिसाळ यास सदोष मनुष्य वधप्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी व चार हजार रुपये दंडाची शिक्षा तसेच आरोपी विलास मिसाळ यास खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन वर्षे सक्त मजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड.बाबासाहेब इंगळे यांनी काम पाहिले.