भोकरदन : वाळूमाफिया समजून तक्रारदार शेतकऱ्यालाच फोन करणाऱ्या तलाठ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत तहसीलदार डॉ. सारिका कदम यांनी तत्काळ तलाठी किशोर सखाराम खंडारे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केला होता.
उपविभागीय अधिकारी डॉ. दयानंद जगताप यांनी याची गंभीर दखल घेत सोमवारीच तलाठी खंदारे यांना निलंबित केले आहे. भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथील शेतकरी संतोष पवार यांनी शेताशेजारील नदीपात्रातून रस्ता तयार केला जात असल्याची तक्रार तलाठी खंदारे यांच्याकडे केली हाेती. परंतु, कारवाई न झाल्याने पवार यांनी तहसीलदारांनाही याची माहिती दिली होती. यानंतर तलाठी खंदारे यांनी वाळूमाफिया समजून तक्रारदार शेतकरी पवार यांनाच फोन लावला. त्याला काठीने मारा, भांडणे करा, गुन्हा दाखल करा, त्याच्या भावाचे नाव तक्रारीत द्या, असा सल्ला दिला होता. यामुळे भयभीत झालेल्या पवार यांनी हसनाबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तसेच प्रशासनालाही याची माहिती दिली.
शेतकऱ्याची तक्रार आणि यापूर्वी दिलेल्या कारणे दाखवा नोटिसांची उत्तरे न देणे, हसनाबाद परिसरात अवैध वाळू उत्खनन, वाहतुकीविरूद्ध एकही कारवाई न करणे, मुख्यालयी न राहणे आदी कारणांमुळे खंदारे यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव तहसीलदार डॉ. सारिका कदम यांनी सोमवारीच उपविभागीय अधिकारी डॉ. दयानंद जगताप यांच्याकडे सादर केला होता. डॉ. दयानंद जगताप यांनी या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत तलाठी किशोर खंदारे यांना निलंबित केले आहे.
जाफराबाद तहसीलला केले संलग्ननिलंबन कालावधीत तलाठी किशोर खंदारे यांना जाफराबाद तहसील कार्यालयाशी संलग्न करण्यात आले आहे. तहसीलदारांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, निलंबन कालावधीत खासगी नोकरी स्वीकारू नये यासह इतर सूचनाही निलंबन आदेशात देण्यात आले आहेत.