लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या येथील होलिकोत्सवाची मंगळवारी भंद्या आईच्या सोंगाने सांगता झाली. यावेळी सायंकाळी निघालेल्या गवळणींच्या फुगड्यांनी कार्यक्रमात विशेष रंगत आणली होती.कलगी- तुरा परंपरा जपणाऱ्या या गावात होलिकोत्सव जवळपास आठवडाभर चालतो. मंगळवारी दोन्ही वेशीतून एकाच वेळी मानाचे असलेले भंद्या आईचे सोंग काढण्यात आले. यात तुरा गटाकडून हे सोंग नितीन आवटी यांनी तर कलगी गटाकडून संतोष भागवत यांनी घेतले होते. सोंगाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी दोन्ही वेशींच्या आतील रस्त्यावर एकच गर्दी केली होती. यावेळी सोंगाच्या अंगावरून क्विंटलने रेवड्या उधळण्यात आल्या. प्रसाद म्हणून अनेक जण या रेवड्या उचलून खातात.या होलिकोत्सवासाठी कलगी गटाकडून भिवसन धनवई, भाऊराव महाराज, राधाकिसन वाघ, लक्ष्मण वाघमोडे, महादू भागवत, महादू इंगळे, गीताराम इंगळे, गजानन धनवई, पांडुरंग धनवई, शेषराव भागवत, सुभाष जाधव, शिवाजी जाधव हे तर तुरा गटाकडून जीवन खांडेभराड, एकनाथ खांडेभराड, आसाराम तांबेकर, गोविंद खांडेभराड, रामू कुमकर, दत्तू पाथरे, भीमराव जमधडे, गोविंद तांबेकर, बापुराव खांडेभराड, हरिभाऊ आवटी, बाबू आवटी, रमण मुनेमाणिक, रघुनाथ तांबेकर आदींनी पुढाकार घेतला.तुरा गटाकडून भंद्या आईचे सोंग घेण्याची परंपरा आवटी घराण्याने पूर्वी पासून जपली आहे. यासाठी सध्या औरंगाबाद येथे स्थायिक झालेले राधाकिसन आवटी दरवर्षी या सोंगासाठी आपल्या परिवारासह गावाकडे येत असतात. त्यांनी सतत ४० वर्ष हे सोंग घेतले आहे.प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या ते सोंग घेत नसले तरी आजही तेवढ्याच उत्साहाने ते सोंग उत्सवात सहभागी असतात.नाथ षष्ठीनिमित्त देवीची स्वारीटेंभुर्णी : नाथ षष्ठी नमित्त जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव येथे मंगळवारी सकाळी येथील आराध्यदैवत आई जगदंबा देवीची स्वारी काढण्यात आली. जगदंबा देवी स्वारी उत्सव हा वर्षातून दोन वेळा काढण्याची जुनी परंपरा आहे. पहिला स्वारी उत्सव हा एकनाथ षष्ठीला तर दूसरा स्वारी उत्सव हा चैत्र गुढीपाडवाच्या दिवशी काढण्यात येतो. जगदंबा देवी स्वारी घेण्याचा मान गावातील लिंगायत समाजाचे शंकरअप्पा जितकर यांच्याकडे आहे. ही देवी नवसाला पावणारी असल्याने या दिवशी पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी हजेरी लावतात. देवीचा खास मुकूट बनविण्यासाठी गावातील सखाराम सवडे, बाबू महाराज कांबळे, बाजीराव सवडे, पुरोहित अशोक जोशी, सिद्धेश्वर लंगोटे, प्रकाश घोडसे, पंढरी कापसे, सुभाष गवळी, दादाराव सवडे, रामेश्वर सवडे आदींनी पुढाकार घेतला. यावेळी सपोनि. अशोक जाधव व पोकॉ. दिनकर चंदनशिवे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.भागूबाई देवी यात्रेची सांगतालोकमत न्यूज नेटवर्कजळगाव सपकाळ : येथील भागूबाई देवीची यात्रा सोमवारी आणि मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. दरम्यान देवीच्या दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमणात गर्दी केली होती. मंगळवारी या यात्रेची सांगता झाली.सोमवारी दिवसभर देवीच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यंदा यात्रेमध्ये विविध प्रकारची दुकाने थाटली होती. सोमवारी मध्यरात्री देवीच्या यात्रेनिमित्त गणपती, नंदी, महिषासुर यांची सोंगे काढण्यात आली.मंगळवारी सकाळी पोत पेटवून भागूबाई देवीची स्वारी निघाली. या यात्रेसाठी मराठवाड्यासह विदर्भ, खान्देश इ. भागांमधून हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. भागूबाई देवीला तुळजा भवानीचे उपस्थान म्हणून ओळखले जात आहे. आन्वा येथील आजूबाई, पिंपळगाव रेणुकाई येथील रेणुका माता, शिवना येथील शिवाई आणि वडोद तांगडा येथील अंबाबाई या पाच देवी सख्ख्या बहिणी असल्याची आख्यायिका आहे.यात माता भागूबाई सर्वात मोठी असून या देवीला स्वारीचा पहिला मान मिळतो, स्वारीच्या दिवशी पोत खेळण्याचे नवस फेडले जातात. व स्वारीच्या दिवशी ‘बोल भागूबाई माता की जय’ या जयघोषात स्वारी निघते. तसेच मंगळवारी कुस्त्यांचा आखाडा येथे आयोजित करण्यात आला होता.
भंद्या आईच्या सोंगाने सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:28 AM