जालना : कर्तव्य बजावत असताना दिलेले काम प्रामाणिकपणे व गुणवत्तापूर्वक करणे हीच देशसेवा असल्याची भावना राष्ट्रपती पदक प्राप्त येथील राज्य राखीव बल गट क्रमांक तीनमधील सहायक समादेशक जनार्दन जगन्नाथ घाडगे यांनी व्यक्त केली.प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणा-या अधिकारी व कर्मचा-यांना सातत्यपूर्ण व गुणवत्तापूर्वक सेवेसाठी राष्ट्रपती पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये सहायक समादेशक घाडगे यांचाही समावेश आहे. याबाबत घाडगे म्हणाले, की १९८३ मध्ये राज्य राखीव दलात शिपाई म्हणून सेवेस सुरुवात केली. त्यानंतर जालना, अमरावती, दौंड येथे हेड कॉन्स्टेबल, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस निरीक्षक ते सहायक समादेशक या प्रवासात सातत्याने गुणवत्तापूर्ण कामास प्राधान्य दिले. २००२ मध्ये दौंड नानवीज येथील राज्य राखीव दलाच्या प्रशिक्षण केंद्रात नवीन मुलांना प्रशिक्षण देण्याचे काम केले. त्यानंतर २०१२ मध्ये पुन्हा जालना एसआरपीएफमध्ये सहायक समादेशक म्हणून रुजू झालो. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम काम करणे व इतरांनीही आपलेसे करण्याचा स्वभाव यामुळे विविध कर्तव्ये चांगल्या पद्धतीने पार पाडता आली. प्रशासकीय कामकाजाबरोबरच महाराष्ट्र, गुजरात, केरळ, कलकत्ता इ. ठिकाणी निवडणुकीसह अन्य बंदोबस्ताची कामे जबाबदारीने पूर्ण केली. अनेक प्रसंगांत नव्याने पोलीस दलात दाखल तरुणांना योग्य मार्गदर्शन व सल्ला दिला. त्याचेच फळ राष्ट्रपती पदकाच्या निमित्ताने मिळाले. याचा आनंद असल्याची भावना घाडगे यांनी व्यक्त केली.----------मुलगाही पोलीस सेवेतआपल्याला पोलीस सेवेची आवड आहे. त्यामुळे मुलानेही पोलीस दलात काम करावे, अशी इच्छा होती. आपला मुलगा विकास राज्य राखीव दलात रुजू झाला. याचाही आनंद असल्याचे ते म्हणाले.
प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणे हीच देशसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:19 AM