जालना : कोरोनाच्या रुग्णवाढीमुळे ऑक्सिजनची सर्वत्र प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जालन्याला भेट दिली. यावेळी त्यांनी एमआयडीसीतील ऑक्सिजन निर्मितीच्या प्लांटला भेट देण्यासह स्टील उद्योजकांसोबत बैठक घेतली. यावेळी स्टील उद्योजकांनी ओडिसा, तसेच बेल्लारी येथून ऑक्सिजन आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. त्यानुसार हा अन्य राज्यांतून आणलेला ५० टक्के ऑक्सिजन शहरातील रुग्णालयांना द्यावा, अशी सूचना केंद्रेकर यांनी बैठकीत केली.
येथील एका स्टील कंपनीत ही बैठक पार पडली. यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेेकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जालन्याचे उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, जालन्याचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्यासह अन्य अधिकारी हजर होते. प्रारंभी केंद्रेकर यांनी येथील ऑक्सिजन निर्मिती प्लांटला भेट देऊन पाहणी केली, तसेच तेथे रोज किती ऑक्सिजन उपलब्ध होतो याचा आढावा घेऊन सूचना केल्या, तसेच येथील ऑक्सिजन हा केवळ रुग्णालयांसाठी देण्याचे निर्देश दिले, तसेच येथे पोलीस आणि महसूलचे कर्मचारी तैनात कसे राहतील, याच्याही सूचना दिल्या.
या बैठकीस महाराष्ट्र स्टील मॅन्यू फॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष योगेश मानधनी, घनश्याम गोयल, सतीश अग्रवाल, सुरेंद्र पित्ती, डी. बी. सोनी, दिनेश राठी, कैलास लोया, नितीन काबरा, अनिल गोयल, अरुण अग्रवाल, आशिष भाला, विजय मित्तल, राजेंद्र भारुका यांच्यासह अन्य उद्योजकांचा समावेश होता. यावेळी मानधनी, तसेच सोनी यांनी आयुक्तांना स्टील उद्योगात ऑक्सिजनचे महत्त्व पटवून दिले, तसेच तो आणण्यासाठी आम्ही ओडिशा आणि बेल्लारी येथील ऑक्सिजन प्लांटच्या संपर्कात असल्याचे सांंगितले. तेथून ऑक्सिजन आणून त्यातून आम्ही आमचे उद्योग चालविणार असल्याचे सांगितले. केंद्रेकरांनी स्टील उद्योजकांचे म्हणणे ऐकून घेतले, तसेच त्यांना सूचनाही केली.
उद्योग बंद व्हावेत हा हेतू नाहीस्टील उद्योग बंद व्हावेत हा प्रशासनाचा हेतू नाही; परंतु स्टील उद्योजकांनी बाहेरच्या राज्यातून जी ऑक्सिजन आणण्याची तयारी चालविली आहे, त्यातूनही किमान ५० टक्के ऑक्सिजन हा शहरातील विविध रुग्णालयांना पुरविल्यास त्याचा मोठा लाभ कोरोना आजाराने गंभीर असलेल्या रुग्णांना होणार आहे. या केंद्रेकरांच्या मागणीस उद्योजकांनी सकारात्मक पाठिंबा दर्शविला.