जालना : ग्रामीण भागात घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी जेरबंद केले. बाबासाहेब शिंदे, पांडू गंगाराम पवार, संजय तारचंद राठोड, मुरलीधर शंकर राठोड (सर्व रा. विरेगाव तांडा, ता. जि. जालना) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून महिंद्रा मॅक्झिमो वाहन, गुन्ह्यात चोरी गेलेली एक लोखंडी पेटी, रोख रक्कम, चार तोळ्यांची सोन्याची लगड असा एकूण ४ हजार ६३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती घेत असताना, भोकरदन, पारध, परतूर, सेवली पोलिस ठाण्यांच्या हद्दीत बाळासाहेब शिंदे याने घरफोड्या केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांना मिळाली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला विरेगाव तांडा येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्यांबाबत विचारपूस केली असता, त्याने साथीदार पांडू पवार, संजय राठोड, मुरलीधर राठोड यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांनी आन्वा, भोकरदन शहर, आव्हाणा, जळगाव सपकाळ, पिंपळगाव रेणुकाई, जयपूर, मसला या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी महिंद्रा मॅक्झिमो वाहनातून जाऊन घरफोड्या केल्या आहेत. त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्यात वापरलेले महिंद्रा मॅक्झिमो वाहन, चोरी गेलेली एक लोखंडी पेटी, रोख रक्कम १३ हजार १००, आणि ४ तोळ्यांची सोन्याची लगड असा एकूण ४ लाख ६३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्यांच्याकडून घरफोडीचे सात गुन्हे उघडकीस आले आहेत. या चारही आरोपींना पारध पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे, प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पोउपनि. प्रमोद बोंडले, पोलिस अंमलदार पोहेकॉ. सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडधे, कृष्णा तंगे, कृष्णा चौधरी, सागर बाविस्कर आदींनी केली आहे.