लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेली पाच वर्षे सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐन निवडणुकीतच आपण मागास असल्याची जाणीव कशी झाली, असा सवाल करून जर तुम्ही मागास म्हणवूनच घेत असाल, तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या फाईलवर स्वाक्षरी करण्यास तुमचे हात का धजावले नाहीत, असा प्रतिप्रश्न वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.जालना लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. शरदचंद्र वानखेडे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी प्रकाश आंबेडकर यांची जालन्यात सभा पार पडली.साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याचा आंबेडकर यांनी समाचार घेतला. शाप दिल्याने आतापर्यंत कोणाचा मृत्यू झाला हे ऐकिवात नसल्याचे ते म्हणाले. यातून त्यांची वृत्ती कशी, हेच जगासमोर आल्याचे ते म्हणाले. अशोक चव्हाण म्हणतात की, आंबेडकरांकडे पैसा येतो कुठून? याला उत्तर देताना आंबेडकर यांनी सांगितले की, मी सर्वांसमोर लोकवर्गणी करून आलेले पैसे टीव्ही कॅमेऱ्यासमक्ष स्वीकारतो.राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी २०१४ मध्ये भाजपने पाठिंबा मागण्याआधीच पाठिंबा देऊ केला होता, हे सांगून शरद पवार यांच्या भाजपशी असलेल्या मैत्रीमुळे अजित पवार हे जेलमध्ये नसल्याचेही सांगून त्यांनी खळबळ उडवून दिली. यावेळी उमेदवार डॉ. शरद वानखेडे, दीपक डोके, माजेद खान यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अकबर इनामदार आदींची उपस्थिती होती.
पंतप्रधान मोदींना आताच मागास असल्याची जाणीव कशी झाली ?- प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:58 AM