शेगाव- देशात आज भाजपानं हिंसा, द्वेश आणि दहशत पसरवली आहे. या दहशत, द्वेष आणि हिंसेच्या विरोधात ही यात्रा सुरु केली. या यात्रेचं ध्येय कुणाला काही समजवायचं नाही. या यात्रेचा उद्देश आपला आवाज, आपलं दु:ख समजून घेण्याचा आहे, असं काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी आज शेगावमध्ये आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होते.
७० दिवसांपूर्वी मी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली असून दररोज २५ किमींचा पायी प्रवास आमचा सुरू आहे. या प्रवासात अनेक राज्यातून येत मी महाराष्ट्रात पोहोचलो आहे. तिरस्काराने कधीही या देशाला फायदा झाला नाही, प्रेमानेच देश पुढे जातो. कुटुंबात द्वेष पसरवल्यानंतर कुटुंबाचं भलं होत नाही. मग, देशात द्वेषाचं राजकारण केल्यानंतर देशाला फायदा होईल का? असे म्हणत राहुल गांधींनी उपस्थित जनसमुदायालाच सवाल केला.
देशात हजारो शेतकरी आत्महत्या करत असून शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळत नाहीत, युवकांना रोजगार मिळत नाही. पण उद्योगपतींचे हजारो कोटींचं कर्ज माफ केलं जातंय, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली. तसेच भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी संवाद साधतोय. पण, मी मन की बात करायला आलो नसून मी तुमचा आवाज ऐकायला आलोय. लोकांमध्ये राहून लोकांच्या समस्या जाणून घेत आहे, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.