लोकमत न्यूज नेटवर्कजालना : माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला बुधवारी जिल्ह्यातील ६३ केंद्रांवर शांततेत सुरुवात झाली. पहिला पेपर इंग्रजी विषयाचा होता. शहरासह जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तासह सहा भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.जिल्ह्यातील ६३ परीक्षाकेंद्रावर सकाळी अकरा वाजता परीक्षेला सुरुवात झाली. गत काही वर्षात प्रश्न पत्रिका फुटण्याचे प्रकार होत असल्याने या वेळी परीक्षा विभागाने आवश्यक खबरदारी घेतली आहे. जिल्ह्यात सहा भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. यात महिला पथकाचा समावेश आहे. जिल्ह्यात २७ हजार ८१७ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. यात विज्ञान शाखेचे ११ हजार ८०५, कला शाखेचे १३ हजार ४१६, वाणिज्य शाखेचे २२१० आणि एम.सी.व्ही चे ३८६ समावेश आहे. परीक्षा केंद्रावर कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून राज्य परीक्षा मंडळाने विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी साडेदहा वाजताच परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. याची कडक अंमलबजावणी झाल्याचे ठिकठिकाणच्या परीक्षा केंद्रावर पहावयास मिळाले. शहरातील परीक्षाकेंद्रावर वेळेत उपस्थित राहण्यासाठी परिक्षार्थीसह पालकवर्गाची धावपळ दिसून आली. पहिल्याच दिवशी इंग्रजी पेपर असल्याने विद्यार्थ्यांची धाकधूक सुरू होती. परीक्षार्थींना कुठल्याही प्रकारे वाहतूक कोंंडीचा त्रास होऊ नये म्हणून शहरातील प्रमुख मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा सेंटरवर पोहचण्यास मदत झाली. तसेच परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त दिसून आला. शहरासह आठही तालुक्यातील परीक्षा केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार न घडता पहिला पेपर विद्यार्थ्यांनी शांतेत सोडवला. केंद्रावर विद्यार्थ्यांना जागेवरच पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.शहरातील मत्स्योदरी महाविद्यालय, उर्दु हायस्कुल, सरस्वती भुवन प्रशाला, जेईएस महाविद्यालय, मल्टीपर्पज हायस्कूल, नुतन महाविद्यालय आदी सेंटरवर चोख पोलीस बंदोबस्त दिसून आला. प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.
पहिला पेपर शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:47 AM