जालना : कोरोनाने गेल्या दोन वर्षापासून हाहाकार माजविला आहे अशाही स्थितीत एकमेकांना धीर आणि आधार देऊन कॉलनीतील नागरिकांनी एकमेकांशी जिव्हाळा ठेवून माणुसकीचे नाते जपल्याचा सूर वृंदावन कॉलनीतील नागरिकांनी आळविला.
पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत अनेकांना या कोरोनाचा विळखा सहन करावा लागला यात अनेकांनी संकटाशी दोन हात केले. पारिवारिक आणि शेजाऱ्यांनी जी माणुसकी आणि हिंमत दिली त्यातूनच आम्ही सर्वं जणांनी एकत्रित येत कोरोनाला वेशीवर राेखले. या आजाराने एकमेकांपासून दूर असलो तरी सोशल मीडिया आणि सुरक्षित अंतर ठेवून आम्ही एकत्रच होतो.
या काळात कॉलनीतील स्वच्छतेला महत्व दिले. पर्यावरणपूरक उपक्रम राबविले. असे अनेक चांगले अनुभव गुरुवारी वृंदावन कॉलनीत झालेल्या बैठकीत नागरिकांनी सांगितले. श्रीकृष्ण मंदिरात ही बैठक पार पडली. यावेळी अनिल भेरे यांनी उपस्थितांचे आभार मानून एकोप्याबद्दल माहिती दिली. यावेळी संजय कंठाळे यांनीही विचार मांडले. कार्यक्रमास ॲड. बलवंत नाईक, विष्णुपंत कंठाळे, उदय कुलकर्णी, अजित चौधरी, कीर्ती जोशी, छाया नाईक, नलिनी चौधरी, नलिनी जोशी, प्रीती पाठक, योगेश पाठक, निकिता रुद्राक्ष, दिशा डोल्हारकर, सुजाता खंडाळे, विद्या सोरटी, संगीता राख, संगीता कंठाळे, सुमन नामेवार, वैशाली काळे, दीपाली कंडारकर, जानकी रुद्राक्ष, वैशाली उन्हाळे, डॉ. डी. के. भोसले आदींची उपस्थिती होती.
कोरोना काळात आमच्या परिवारातील काही सदस्यांना दोन वेळेला घरले होते. त्यात माझ्यासह सासूबाईंचा समावेश होता. परंतु, कॉलनीतील सर्वांनी साथ दिली त्यामुळे आम्हाला हिंमत मिळाली. शिवभोजन उपक्रमातून गरिबांसाठी जी मदत करता आली त्याचेच आशीर्वाद मिळाले आहेत.
-ॲड. पूनम नाईक
कोरोना काळात मलाही लागण झाली. असे असले तरी आमच्या कॉलनीतील ज्येष्ठ तसेच मुलांनी मला मोठी साथ दिली. मी क्वॉरंनटाइन असली तरी आमच्या कॉलनीतील माझ्या मित्र मैत्री या अंगणात येऊन सुरक्षित अंतर ठेवून संपर्कात होत्या. त्याचा आनंद आहे.
- राजेश्वरी राख
कोरोनाने सर्वांना माणुसकीचे धडे शिकविले. आमच्या कॉलनीमध्ये कुठलाही कार्यक्रम असला तरी तो सर्वजण एकत्रित येऊन साजरा करतात. त्यामुळे जिव्हाळा आणि माणसुकी हे आमच्या कॉलनीचे वैशिष्ट आहे. आणि ते आम्ही पुढेही कायम ठेवणार आहोत.
- ॲड. संजय देशपांडे
गेल्या पंधरा वर्षांपासून आमची कॉलनी नेहमीच एक आदर्श कॉलनी म्हणून ओळखली जाते. युवक-युवती आणि घरातील ज्येष्ठ तसेच महिलांचाही कुठल्याही कार्यक्रमात एकोपा आणि हिरीरी असते. यामुळेच आम्ही कोरोना काळात एकमेकांना मोठी साथ दिली.
- राजेंद्र राख
कोरोनाने सर्वांत मोठे नुकसान हे विद्यार्थ्यांचे झाले आहे. याचा परिणाम त्यांच्या एकूणच जीवनशैलीवर झाला आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून मोठा लाभ झाला आहे. परंतु, जे शाळेत जाऊन शिक्षण मिळते त्याची गुणवत्ता आणि महत्त्व वेगळे असते.
- रूपाली नामेवार