लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : आज जेथे माणूस माणसाच्या जिवावर उठत आहे. कुठे आई- वडिलांना ठार मारणारी मुले तर कुठे पोटच्या लेकरांचा जीव घेणारे माय- बाप. असे चित्र आजच्या समाजात दिसून येत असले तरी पशुमधील ममत्व आजही अबाधित आहे. आपल्या चिमुकल्या बाळाचे कलेवर सतत तीन दिवसांपासून पोटी चिटकवून हिंडणारी वानरीण पाहिली की काही वेळ का होईना; आमची माणुसकी ओशाळल्याशिवाय राहत नाही. येथे एका वानरिणीच्या नवजात पिलाचा अचानक मृत्यू झाला. मेल्यानंतरही ती वानरीण आपल्या पिलाला सोडायला तयार नाही. त्या चिमुकल्या बाळाचे कलेवर पोटी धरून ती माय या झाडावरून त्या झाडावर हिंडत आहे. इतकेच नाही तर इतर वानरेही ते मृत पिलू जवळ घेऊन त्याची माया करताना दिसत आहेत.तीन ते चार दिवसांपूर्वी हे पिलू उष्माघाताने मेल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पिलाच्या शोकात या मातेने तीन दिवसांपासून झाडाच्या पानालाही तोंड लावले नसल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. वेड्या आईची ही वेडी माया पाहून अनेकांच्या डोळ््यांच्या कडा पाणावत असल्या तरी माणुसकीचा गहिवरही या घटनेतून उचंबळून यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.यापूवीर्ही वानरिणीच्या अशा मृत पिलांच्या घटनेचे साक्षीदार असलेल्या काहींनी सांगितले की कधी कधी अशी वानरीण पिलाच्या मृत देहाचा पार वाळून सांगाडा होईपर्यंत त्याला सोडत नाही. कोणी पिल्लू ओढण्याचा प्रयत्न केला तर ती अंगावर धावून जाते.
पशुममतेपुढे ओशाळली माणुसकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 12:51 AM