जालना : द्राक्ष उत्पादनासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या जालना जिल्ह्यातील कडवंची परिसरात द्राक्ष उत्पादकांवर मोठे संकट कोसळले आहे. परतीचा पाऊस तसेच ढगाळ वातावरणामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले असून, ५० कोटींचा फटका बसला आहे. मात्र, एप्रिलमध्ये द्राक्ष बागांची दुसरी छाटणी बळ देईल, या आशेवर द्राक्ष उत्पादक या संकटाचा खंबीरपणे सामना करण्यासाठी उभा राहतो आहे. शासनाकडून मदत मिळाली, ती अत्यंत तोकडी आहे. शासनाने पाठीशी उभे राहावे व पुरेशी मदत करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
३० वर्षांपूर्वी कृषिभूषण विजयअण्णा बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील ग्रामस्थांनी एकत्र येत कृषी विज्ञान केंद्र आणि जर्मन पाणलोट क्षेत्र विकास संस्थेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे केली. माती नालाबांध, बांधबंदिस्ती नदीवर लहान- लहान बंधारे बांधून जमितीत पाणीपातळी वाढविली. त्यानंतर येथे द्राक्ष लागवड करून येथील शेतकऱ्यांनी परिश्रमातून कृषी क्रांती घडवून आणली. दीड हजार लोकवस्तीचे गाव असलेल्या कडवंचीत दोन हजार हेक्टरवर द्राक्ष बागा आहेत.
गेल्या पंधरा वर्षांत येथील शेतकऱ्यांनी शेती हेच आपले घर मानले, अनेक जण शेतातच वास्तव्याला आहेत. सोनाका, माणिक चमन या जातींची द्राक्षे घेतली जातात. आता उन्हाळा जवळ आला असून, द्राक्ष बागांचा हंगाम तेजीत आहे. यंदा जबलपूर, चिखली तसेच अन्य गावांमधून बागा खरेदी करणाऱ्यारांनी द्राक्ष बागांची खरेदी सुरू केली आहे. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे यंदा द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्पादनात मोठी घट आली आहे.
गेल्यावर्षी ७२ कोटींची उलाढालगेल्यावर्षी चांगले वातावरण राहिल्याने द्राक्ष उत्पादकांना त्यांच्या श्रमाचे फळ मिळाले होते. गेल्या हंगामात जवळपास ७३ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. ती यंदा केवळ दहा ते १२ कोटींवर येऊन ठेपली आहे. यामुळे यंदा शेतीत केलेला खर्च निघणेही अवघड झाले आहे.
मदतीची अपेक्षाअतिवृष्टी तसेच परतीचा पाऊस यामुळे झालेल्या नुकसानीपोटी शासनाकडून मदत मिळाली; परंतु ही मिळालेली मदत अत्यंत कमी आहे. मदत आणखी वाढवून मिळावी, अशी या भागातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. एवढे होऊनही शेतकरी हिंमत हरला नाही, एप्रिलमध्ये द्राक्ष बागांची दुसरी छाटणी असते. त्यावेळी तरी चांगले उत्पादन येईल, अशी आशा येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.