बदनापूर (जालना ) : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या हत्या केलेल्या पतीनेही रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री अकरा वाजेच्यासुमारास शहरात घडली. कुशवर्ता भोसले (३५) व भाऊसाहेब भोसले (३५) (दोघे रा. बदनापूर) असे मयत पती पत्नीचे नाव आहे.
भाऊसाहेब भोसले हे पत्नी व मुला सोबत शहरालगतच असलेल्या दुधना नदी जवळील आपल्या स्वत:च्या शेतात राहत होते. भाऊसाहेब भोसले मिनीडोअर चालवुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. २१ आॅक्टोबर रोजी रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास भोसले यांचा पत्नी कुशवर्ता यांच्यासोबत वाद झाला. भाऊसाहेब यांनी पत्नीवर शस्त्राने मानेवर, पाठीवर, हातावर वार करुन गंभीर जखमी केले. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे लक्षात येतात भाऊसाहेब भोसले यांनी पळ काढला.
कुशवर्ता यांच्या ओरडण्याने आजुबाजुचे नातेवाईकांनी धाव घेतली. मात्र गंभीर वारामुळे कुशवर्ता भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नीवर हल्ला करुन पसार झालेला भाऊसाहेब भोसले यांनी जालना-औरंगाबाद या रेल्वे मार्गावर बदनापूर रेल्वे स्थानकापासुन सुमारे एक किमी अंतरावर जावुन रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी त्यांचा मुलगा नितीन भाऊसाहेब भोसले याच्या फिर्यादीवरून भाऊसाहेब कडुबा भोसले यांच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी ढवळे, पोनि. रामेश्वर खनाळ यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. पती पत्नी मध्ये अगोदर शेतविक्रीबाबत घरगुती वाद झाला होता. असे तपासात निदर्शनास येत आहे. या दृष्टीनेही आमचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास सहायक पोलीस निरीक्षक पी. एस. बोलकर हे करीत आहेत.