लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भोळसर पतीचा विळीने गळा कापून खून करणे तसेच लहान मुलीला विळीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी पत्नीस १० वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा येथील प्रधान न्यायाधीश एस.व्ही. टेकाळे यांनी सुनावली.घनसावंगी तालुक्यातील शिवणगाव येथील रहिवासी आरोपी अनिता संतोष तौर (२७) हिचा पती संतोष तौर याचा विळीने गळा कापून खून केल्याची घटना २४ नोव्हेंबर २०१४ रोजी रात्री घडली होती. पती संतोष आणि अनिता यांच्यात नेहमी भांडण होत असे. या वादातूनच पत्नी अनिताने संतोषचा खून केला.यावेळी अडीच वर्षाची मुलगी संस्कृती हिच्यावर विळी आणि मुसळीने वार केले. यात मुलगी देखील गंभीर जखमी झाली होती. रुग्णालयात नेत असतानाच त्या मुलीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी लता सुभाष तौर यांच्या फिर्यादीवरून घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाल्यावर युक्तिवाद होऊन सरकारी पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले.न्यायाधीश टेकाळे यांनी आरोपी अनिता हिला कलम ३०४ (भाग-१) अन्वये दोषी ठरवून १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि १ हजार रुपये दंड सुनावला आहे. या प्रकरणामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जयश्री सोळंके-बोराडे यांनी बाजू मांडली.
पतीचा खून; पत्नीस सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 1:04 AM