जिल्ह्यात डीएडची नऊ महाविद्यालये : पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक जागा रिक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : एके काळी डीएड महाविद्यालयात प्रवेश मिळावा, म्हणून प्रतीक्षा यादी होती. आज नेमकी याच्या उलट परिस्थिती असून, जिल्ह्यातील नऊ डीएड महाविद्यालयांतील ५० टक्क्यांपेक्षा अधिक जागा रिक्त असल्याचे दिसून आले. शिक्षकी पेशा हा अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जातो, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी तुलनेने कमी आकर्षित होत आहेत.
समाजामध्ये शिक्षकांचा मोठा सन्मान होत असल्याने त्याला प्रतिष्ठा होती, परंतु आता शिक्षक भरतीच होत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. डीएडनंतर टीईटी ही परीक्षा आणि मुलाखतीच्या वेळी अभिव्यक्त चाचणी देऊनही नोकरी मिळत नसल्याने डीएडच्या शेकडो जागा रिक्त राहिल्या आहेत.
नौकरीची हमी नाही
n पूर्वी डीएड म्हणून हमखास नोकरीची हमी देणारा अभ्यासक्रम म्हणून ओळखला जात होता.
n आता शिक्षक भरती बंद असल्याने हा अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरीची हमी मिळत नाही.
डीएड पूर्ण केल्यानंतरही गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षक भरती झालेली नाही. यातच टीईटीसह अन्य परीक्षांचा ससेमिरा मागे लावला आहे. शिक्षक झाल्यानंतरही शिक्षणाव्यतिरिक्त अनेक शासकीय उपक्रमांमध्ये शिक्षकांना गुंतविले जाते.
- कुंदन राजपूत
डीएडच्या तुलनेने विशेष करून मुलींसाठी आता संगणकासंदर्भातील अनेक अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे डीएडऐवजी आपण संगणक अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले. शिक्षकांची भरती आणि विनाअनुदान धोरण, यामुळे आपण हा निर्णय घेतला.
- पद्मिनी कुंभेफळकर.
डीएड केल्यानंतर आज जरी शिक्षक भरती बंद असल्याने नोकरी मिळत नाही, हे वास्तव आहे, परंतु हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना नेमके कशा प्रकारे शिकवावे, याची शास्त्रोक्त धडे देतो. विनाअनुदान धोरण बंद झाल्यास पुन्हा चांगले दिवस येतील.
- प्राचार्य विष्णू तारगे
डीएड पूर्ण केल्यानंतर टीईटी परीक्षा आवश्यक केली आहे. त्यामुळे डीएडमध्ये दोन ते अडीच वर्षे शिक्षण घेण्याऐवजी अनेक विद्यार्थी व्यावसायिक शिक्षणाकडे वळले आहेत. याचा परिणाम डीएडमधील रिक्त जागा राहण्यावर झाला आहे.
- प्राचार्य विजय अदलाक.