लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील भोकरदन, परतूर आणि बदनापूर विधानसभा मतदार संघात अत्यंत सरळ पध्दतीने उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. तर जालना, घनसावंगी मतदार संघात मात्र रात्री ९ वाजेपर्यंत आक्षेपांबाबत निर्णय लांबल्याने उमेदवारांच्या ह्रदयाचे ठोके चुकले होते.विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेतील आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता. कोण कोणत्या उमेदवाराविरूध्द कुठला आक्षेप घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यामुळे सकाळपासूनच तहसील कार्यालयामध्ये उमेदवार तसेच उमेदवारांच्या समर्थकांची मोठी गर्दी दिसून आली. परतूर, बदनापूर तसेच भोकरदन मतदार संघात फारसे आक्षेप न आल्याने तेथील प्रक्रिया सुरळीत पार पडल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. तर जालना आणि घनसावंगी मतदार संघात चुरशीच्या लढती होत आहेत. त्यातच जालन्यातील राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या विरोधात आम आदमी पक्षाचे कैलास फुलारी यांनी रामनगर साखर कारखान्यासंदर्भात गंभीर आक्षेप दाखल केल्याने मोठी खळबळउडाली होती. यामध्ये ज्यावेळी खोतकर यांनी त्यांच्या अन्य भागीदारांसोबत हा सहकारी साखर कारखाना खरेदी केल्यानंतर त्यावेळी शेतकऱ्यांसह कामगारांचे देणे, त्या कारखान्याची असलेली शासकीय जमीन अधिग्रहण करण्याचा मुद्दा आक्षेपात नोंदविण्यात आला होता.परंतु, या आक्षेपासंदर्भात खोतकर यांनी काही महिन्यांपूर्वी या उद्योगाच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याची कागदपत्रे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केली. शिक्षणासंदर्भातील माहिती याबद्दलही फुलारी यांनी आक्षेप घेतला होता. परंतु, तोही आक्षेप फेटाळण्यात आला. काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या विरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथील आमदार निवासासंदर्भात तक्रार केली होती. परंतु, हा मुद्दाही फेटाळण्यात आला. एमआयएमचे उमेदवार इकबाल पाशा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दोन पत्नींची माहिती त्यात नमूद केली नसल्याचा आक्षेप काँग्रेसने घेतला होता. तो ही आक्षेप निकाली काढण्यात आला. अपक्ष उमेदवार अब्दूल रशीद पहैलवान यांच्या विरोधातही आक्षेप दाखल होता, तो फेटाळला आहे.सोमवारी चित्र होणार स्पष्टउमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ७ आॅक्टोबर ही आहे. या दिवशी दुपारी ३ वाजल्यानंतर जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात नेमके किती उमेदवार रिंगणात राहतील, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
...अन उमेदवारांच्या हृदयाचे ठोके चुकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 12:50 AM