Manoj Jarange Patil ( Marathi News ) : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांच्याच सहकाऱ्यांनी केलेल्या आरोपानंतर आज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. "मला संपवण्याचं कारस्थान देवेंद्र फडणवीस यांनी रचलं आहे. त्यांच्याच माध्यमातून वेगवेगळी लोकं पुढे करून माझ्यावर वैयक्तिक आरोप केले जात आहेत. फडणवीसांना माझा बळीच हवा असेल तर मी आज त्यांच्या सागर बंगल्यावर येतो, त्यांनी मला ठार करावं. मी सागर बंगल्यावर जाऊन उपोषण करणार आहे," अशी घोषणा जरांगे यांनी केली आहे.
सरकारने सगेसोयऱ्यांबाबत काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषण करत आहेत. मात्र या उपोषणादरम्यान त्यांनी प्रशासकीय अधिकारी आणि सरकारमधील नेत्यांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली. तसंच त्यांनी संत तुकाराम महाराजांचा अवमान केल्याचं सांगत त्यांचे एकेकाळचे सहकारी असलेल्या अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगेंवर अनेक गंभीर आरोप केले. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करायलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस हेच विरोध करत असल्याचा दावाही मनोज जरांगे पाटलांनी केला आहे.