Manoj Jarange Patil ( Marathi News ) : मागील नऊ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. "आज आपण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेत आहोत. जे लोक इथं भेटण्यासाठी येत आहेत त्यांच्यासाठी आपण थोडा वेळ थांबू आणि ४ ते ५ वाजता उपोषण स्थगित करू. आता उपोषण करून नाही तर सत्तेत बसून आरक्षण मिळवू आणि त्रास देणाऱ्यांना सरळ करू," असं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या औचित्यावर १७ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून मनोज जरांगे यांनी उपोषणास सुरुवात केली होती. "पुन्हा आमच्या नावानं बोंबलत बसायचं नाही. सरकारला आम्ही शेवटची संधी देत आहोत, जर आता मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर नंतर काहीही बोलून उपयोग नाही," असा इशारा आंदोलनाच्या सुरुवातीला मनोज जरांगेंनी दिला होता. मात्र मागील नऊ दिवसांत त्यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने आज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेत निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याचे संकेत दिले आहेत.
सरकार दरबारी नेमक्या काय हालचाली सुरू?
मराठा आरक्षण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नुकतीच मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सगेसोयरे अधिसूचनेसह हैदराबाद गॅझेटबाबत महत्त्वाची चर्चा झाली. "मराठा समाजाच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. सगेसोयरे बाबत काढावयाच्या अंतिम अधिसूचनेचे प्रारूप तयार करण्याविषयी तसेच हैदराबाद, मुंबई व सातारा गॅझेटबाबत निवृत्त न्या. गायकवाड व न्या. शिंदे यांचा समावेश असलेल्या सल्लागार मंडळासोबत सकारात्मक चर्चा झाली. याबाबत सह्याद्री अतिथीगृह इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं," अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य शंभूराज देसाई यांनी बैठकीनंतर दिली होती.