जालना : मराठवाड्यात उद्योगासाठी लागणारे कुशल मनु्ष्यबळ घडविण्याबरोबरच आयसीटी उद्योजक घडवेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या उपकेंद्राचे जालना येथील सिरसवाडीत फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यानंतर झालेल्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते.
मुंबई येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या उपकेंद्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी भूमिपूजन करण्यात आले. सिरसवाडी येथील नियोजित जागेवर सकाळी ११.३० वाजता हा कार्यक्रम पार पडला. कोनशिलेच्या अनावरणानंतर शहरातील हॉटेल गॅलेक्सी येथील सभागृहात मुख्य कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्याला प्रगतीपथावर घेऊन जायचे असेल तर, राज्यातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र यासह मागास राहिलेल्या भागाचा विकास करणे महत्वाचे आहे. त्याशिवाय राज्याचा सर्वांगिण विकास होणार नाही.
उद्योजक निर्माण होतील मराठवाडा मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या ९० टक्के निर्णयांची अंमलबजावणी सुरू आहे. आयसीटी हा याचाच एक भाग आहे. उद्योगासाठी गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ महत्त्वाचे आहे. कारण मनुष्यबळ हे या प्रक्रियेत चुंबकाचे काम करते. पुण्यात उत्तम मनुष्यबळ असल्याने तिथे उद्योग आले. मराठवाड्यात आयसीटी ही संस्था कौशल्यपूर्ण आणि उद्योजक निर्माण करण्याचे काम भविष्यात करणार आहे. त्याचबरोबर येथे उभारण्यात येत असलेल्या सीड्स पार्कलाही या संस्थेचा लाभ होणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.